Join us  

'हाऊसफुल ४'मध्ये अक्षय कुमार दिसणार वेगळ्या अंदाजात, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 2:02 PM

'हाउसफुल४' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला 'केसरी' चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारली आहे आणि त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटानंतर अक्षय 'हाऊसफुल ४' चित्रपटात झळकणार आहे. हाऊसफुल फ्रंचायझीच्या या चित्रपटात अक्षय प्रेक्षकांच्या वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. 

मिड डेच्या रिपोर्टनुसार,'हाऊसफुल ४' चित्रपटात अक्षय १६ व्या शतकातील एका महाराजाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात दोन काळ पाहायला मिळणार आहे. त्यातील एक सध्याचा काळ आणि दुसरा १६ व्या शतकातील कालखंड पाहायला मिळेल. तर रितेश देशमुख व बॉबी देओल अक्षयच्या दरबारातील सरदाराच्या भूमिकेत पाहायला मिळतील आणि कृति खरबंदा, क्रिती सेनॉन व पूजा हेगडे राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय चंकी पांडे वास्को द गामाच्या भाच्याची भूमिका साकारताना दिसेल. 

'हाउसफुल४' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. हाउसफुल- ३’ २०१६ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे.

आतापर्यंत या सिरीजचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, सर्वच सुपरहिट ठरले आहेत. आता चौथा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याचबरोबर बॉबी या कॉमेडी सिक्वेंसमध्ये कितपत परफेक्ट बसेल हे बघणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारहाउसफुल 4कियारा अडवाणीक्रिती सनॉन