Join us

अक्षय कुमारच्या पॅडमॅन या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 12:21 IST

अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूरच्या पॅडमॅन या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

टॉयलेट : एक प्रेमकथा या चित्रपटानंतर अक्षय कुमार पॅडमॅन हा चित्रपट घेऊन येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरमध्ये अक्षय आपल्याला मोडकतुडके इंग्रजी बोलताना दिसत आहे. माणूस वेडा असेल तरच तो प्रगती करू शकतो असे देखील अक्षय या ट्रेलरमध्ये म्हणत आहे. पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने या चित्रपटाचा अर्धा पोस्टर लाँच केला होता आणि त्यानंतर काही तासांतच पॅडमॅनचे पूर्ण पोस्टर रिलीज करण्यात आले होते. पहिल्या अर्ध्या पोस्टरमध्ये केवळ अक्षयचा अर्धा चेहरा दिसला होता. पण त्यानंतरच्या पोस्टरमध्ये पांढरा पायजामा आणि पांढरा शर्ट अशा वेषात अक्षय दिसला होता. सुपर हिरो है ये पगला असे या पोस्टरवर लिहिलेले होते. आर. बल्की दिग्दर्शित हा चित्रपट २६ जानेवारी २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षयशिवाय सोनम कपूर आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहेत. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट ट्विंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत असेल; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळविणाऱ्या अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा पॅडमॅन हा चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. Also Read : मासिक पाळीच्या काळात देवळात आणि किचनमध्ये जायचे नाही असे सोनम कपूरला बजावले होते तिच्या आजीने