Join us  

'तुझं करिअर उद्धवस्त करेन'; प्रसिद्ध दिग्दर्शकाची गुरमीत चौधरीला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 4:24 PM

Gurmeet Choudhary: एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्याला करिअर बर्बाद करण्याची धमकी दिल्याचं त्याने अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणजे गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary). अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या गुरमीतने त्याच्या करिअरविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्याला करिअर बर्बाद करण्याची धमकी दिल्याचं त्याने अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. विशेष म्हणजे गुरमीतने या दिग्दर्शकाच्या चित्रपटाची ऑफर नाकारल्यामुळे त्याला ही धमकी मिळाल्याचं तो म्हणाला.

'रामायण' या गाजलेल्या मालिकेत गुरमीतने प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या गुरमीतने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. मात्र, त्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. अलिकडेच त्याने सिद्धार्थ कनन यांना दिलेल्या मुलाखतीत त्याच्या करिअरच्या खडतर प्रवासावर भाष्य केलं आहे. यात चित्रपटाची आलेली संधी त्याच्या हातून कशी गेली हेदेखील त्याने सांगितलं.

दिग्दर्शकाने दिली करिअर उद्धवस्त करण्याची धमकी

"मोठ्या पडद्यावर मी पदार्पण करत असताना एका प्रसिद्ध आणि नावाजलेल्या दिग्दर्शकाने मला त्यांच्या घरी चित्रपटाची कथा वाचवण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी मला त्या चित्रपटाची कथा समजली नाही. आजच्या काळात जर तुम्हाला चित्रपटाची कथा समजत नसेल तर तुम्ही तो चित्रपट रिजेक्ट करु शकता. पण,  त्यावेळची परिस्थिती अशी नव्हती. त्यावेळी मी त्या चित्रपटासाठी नकार दिला. मात्र, माझा हा नकार त्यांना फारसा पटला नाही. यापुढे मी तुला कोणताच चित्रपट करु देणार नाही असं त्या दिग्दर्शकांनी सांगितलं", असं गुरमीत म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "दिग्दर्शकांचं हे वाक्य ऐकून मला धक्काच बसला. हे काय असं? एक अभिनेता म्हणून तरी मला तो चित्रपट निवडण्याचा किंवा नकार देण्याचा अधिकार होता. पण, ते दिग्दर्शक जागेवरुन उठले आणि,  तुला यापुढे कधीच काम करु देणार नाही. तू माझ्या चित्रपटाला कसा काय नकार दिलास? माझा चित्रपट काय वाईट आहे?, असा प्रश्न ते मला विचारु लागले."

२०१५ मध्ये गुरमीतने केलं रुपेरी पडद्यावर पदार्पण

२००९ साली छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या गुरमीतने सुरुवातीच्या काळात अनेक मालिकांमध्ये काम केलं. त्यानंतर २०१५ मध्ये त्याने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 'खामोशियां', 'मिस्टर एक्स', 'वजह तुम हो', 'लाली की शादी में लड्डू दीवाना' आणि 'पलटन' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

रिअॅलिटी शोमध्येही झळकला गुरमीत

गुरमीत 'नच बलिए 6', 'बॉक्स क्रिकेट लीग' आणि 'खतरों के खिलाड़ी 5' या रिअॅलिटी शोमध्येही झळकला आहे.  

टॅग्स :गुरमीत चौधरीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन