२९ वर्षांपासून रिलीजच्या प्रतीक्षेत असलेला गुलजार यांचा ‘लिबास’ या दिवशी होणार रिलीज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 17:49 IST
प्रसिद्ध शायर आणि गीतकार गुलजार यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, गेल्या २९ वर्षांपासून रिलीजच्या प्रतीक्षेत असलेला त्यांचा ...
२९ वर्षांपासून रिलीजच्या प्रतीक्षेत असलेला गुलजार यांचा ‘लिबास’ या दिवशी होणार रिलीज !
प्रसिद्ध शायर आणि गीतकार गुलजार यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, गेल्या २९ वर्षांपासून रिलीजच्या प्रतीक्षेत असलेला त्यांचा ‘लिबास’ हा चित्रपट या वर्षाच्या अखेरपर्यंत रिलीज होणार आहे. तब्बल २९ वर्षे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अडचणीत सापडलेला या चित्रपटाला अखेर मुहूर्त सापडला आहे. अर्थात त्याची तारीख अद्यापपर्यंत निश्चित केली नसली तरी, या वर्षाअखेरपर्यंत चित्रपट रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चित्रपटात अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात राज बब्बर, उत्पल दत्त, अनू कपूर, सविता बजाज आणि सुश्मा सेठ हेदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाची कथा एक थिएटर डायरेक्टर आणि त्यांची पत्नी यांच्या अवती-भोवती फिरणारी आहे. चित्रपटाला आर.डी. बर्मन यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट २९ वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आला होता. परंतु काही वादग्रस्त मुद्द्यांमुळे चित्रपटाच्या रिलीजवर बॅन आणण्यात आले होते. २२ वर्षांपूर्वी गोवा येथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडियामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. प्रसिद्ध गीतकार आणि कवी गुलजार यांच्या आयुष्यात बरेचसे चढ-उतार आले आहेत. १८ आॅगस्ट १९३४ मध्ये जन्मलेल्या गुलजार यांचे खरे नाव संपूर्ण सिंग कालरा असे आहे. गुलजार यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद, गुड्डी, बावर्ची, गोलमाल, मिली आणि नमक हराम यांसारख्या चित्रपटांची गाणी, डायलॉग आणि स्क्रीनप्ले लिहिले आहेत.