Join us  

या गाण्याने वाढवली होती गोविंदा- शिल्पा शेट्टीची डोकेदुखी; हायकोर्टाने दिला दिलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 3:41 PM

‘एक चुम्मा तो मुझको उधार देदे, बदले में यूपी- बिहार ले ले...’ या गाण्यामुळे अडचणीत आलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता गोविंदा यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दिलासा दिला.

ठळक मुद्दे‘एक चुम्मा तो मुझको उधार देदे, बदले में यूपी- बिहार ले ले...’ असे गाणे होते. हे गाणे अपमानास्पद असल्याचे सांगत मुकूंद तिवारी यांनी सन २००० मध्ये पाकुडच्या कनिष्ठ न्यायालयात शिल्पा व गोविंदाविरोधात प्रकरण दाखल केले होते.

‘एक चुम्मा तो मुझको उधार देदे, बदले में यूपी- बिहार ले ले...’ या गाण्यामुळे अडचणीत आलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता गोविंदा यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. संबंधित प्रकरणात पाकुड जिल्हा न्यायालयाने शिल्पा व गोविंदा विरोधात अटक वॉरंट जारी केला होता. काल मंगळवारी झारखंड उच्च न्यायालयाने या अटक वॉरंट स्थगिती आणत, पुढील सुनावणी मार्चमध्ये निश्चित केली.

आता हे प्रकरण काय, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर प्रकरण आहे, १९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘छोटे सरकार’ या गाण्याचे. होय, या चित्रपटात ‘एक चुम्मा तो मुझको उधार देदे, बदले में यूपी- बिहार ले ले...’ असे गाणे होते. हे गाणे अपमानास्पद असल्याचे सांगत मुकूंद तिवारी यांनी सन २००० मध्ये पाकुडच्या कनिष्ठ न्यायालयात शिल्पा व गोविंदाविरोधात प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी करताना कनिष्ठ न्यायालयाने शिल्पा व गोविंदा या दोघांना समन्स जारी केला होता. मात्र समन्स जारी होऊनही शिल्पा-गोविंदा न्यायालयात हजर झाले नाहीत. यानंतर न्यायालयाने दोघांविरोधात अटक वॉरंट जारी केला. कनिष्ठ न्यायालयाच्या या आदेशाला दोघांनीही उच्च न्यायालयात आव्हान दिले. काल याच प्रकरणावर सुनावणी करताना शिल्पा व गोविंदाची बाजू मांडणाºया वकीलांनी हे गीत केवळ मनोरंजनासाठी असल्याचा युक्तिवाद केला. हे गीत शिल्पा व गोविंदावर चित्रीत केले होते. पण त्यांनी ना ते गायले, ना लिहिले. चित्रपट सुरु होण्यापूर्वी या चित्रपटातील दृश्य व संवाद केवळ मनोरंजनासाठी असल्याचे शिवाय त्याचा कुणाशीही संबंध नसल्याचा संदेश दाखवला गेला होता, असे या वकीलाने सांगितले. या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयातील आदेशाला स्थगिती दिली. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीगोविंदा