महाराष्ट्राची लाडकी वहिनी म्हणजे जिनिलीया देशमुख. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. जिनिलियाचा सहज सुंदर अभिनय, तिची निरागसता या गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावतात. नुकतंच जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मोठ्या ब्रेकनंतर जिनिलिया हिला मोठ्या पडद्यावर पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. आता 'सितारे जमीन पर' नंतर आणखी एका चित्रपटातून जिनिलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकतंच सोशल मीडियावर काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो बॉलिवूडची लोकप्रिय आणि हिट कॉमेडी फ्रँचायझी 'मस्ती ४' सिनेमाच्या सेटवरील आहेत. या सिनेमाचं शुटिंग सध्या युनायटेड किंग्डममधील बर्मिंगहॅममध्ये अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात जिनिलिया देशमुख झळकणार आहे.चित्रपटातील एका डान्स साँगमध्ये तिचा कॅमिओ असल्याची माहिती आहे. जिनिलियाचा रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानीसोबत एक डान्स सिक्वेन्स शूट करण्यात आला आहे.
रितेश देशमुखच्या चित्रपटामध्ये जिनिलियाचा कॅमिओ असणं हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. २०१४ साली आलेल्या मराठी ब्लॉकबस्टर 'लय भारी' सिनेमामध्ये "आला होळीचा सण..." या गाण्यात तिचा छोटासा पण लक्षवेधी कॅमिओ होता. त्यानंतर २०१८ मधील 'माऊली' चित्रपटातील 'धुवून टाक' या गाण्यातही ती झळकली होती. विशेष म्हणजे, 'मस्ती' फ्रँचायझीच्या पहिल्याच भागात जिनिलिया आणि रितेश देशमुख यांनी एकत्र काम केलं होतं. आता 'मस्ती ४'मध्ये तिची झलक पाहायला मिळणार आहे, ही बाब चाहत्यांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे.