Join us  

जीवघेणा लठ्ठपणा, डॉक्टर म्हणाले होते सहा महिनेच जगशील, त्यानंतर... अदनान सामीने सांगितला भयावह अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 4:15 PM

Adnan Sami : अदनान सामीने जेव्हा हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती तेव्हा त्याचं वजन हे २०० किलोंहून अधिक होते. त्यामुळे त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागत असे. मात्र नंतर त्याने स्वत:ला फिट करत जवळपास दिडशे किलो वजन कमी केले

मुंबई -  प्रसिद्ध गायक आणि म्युझिक कम्पोझर अदनान सामी हा त्याच्या गायनासोबतच जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनसाठीही ओळखला जातो. अदनान सामीने जेव्हा हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती तेव्हा त्याचं वजन हे २०० किलोंहून अधिक होते. त्यामुळे त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागत असे. मात्र नंतर त्याने स्वत:ला फिट करत जवळपास दिडशे किलो वजन कमी केले होते. दरम्यान, त्याकाळातील अनुभव सांगताना अदनान सामीने तेव्हा मला डॉक्टरांनी जगण्यासाठी केवळ सहा महिन्यांचा अवधी दिला होता, असे सांगितले.

लठ्ठपणा प्रमाणाबाहेर गेल्यानंतरचा अनुभव अदनान सामीने कथन केला आहे. तो म्हणाला की, माझ्या जीवनात तो काळ आला होता, जेव्हा मला झोपता येत नव्हते, उभ्याने झोपावे लागत होते. तेव्हा मला स्वत:चे पाय हलवणेही कठीण जात होते. माझ्या ड्रायव्हराला मला गाडीत बसवण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आले होते. तो ड्रायव्हर माझे पाय उचलून त्या गाडीमध्ये बसवण्यासाठी मदत करायचा.

अदनान सामी पुढे म्हणाला की, तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले होते की, जर तू सहा महिन्यांनंतर तुझ्या पालकांना कुठल्या तरी हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडलो तर मला आश्चर्य वाटणार नाही. मी डॉक्टरांचं म्हणणं कधीही विसरू शकत नाही. कारण ते शब्द माझ्या डोक्यात घर करून बसले आहेत. ९०च्या दशकामध्ये अदनान सामी लिफ्ट करा दे आणि कभी तो नजर मिलाओ या गाण्यांमुळे चर्चेत आला होता. त्याशिवाय त्याचं मेरा तेरा चेहरा गाणंही खूप प्रसिद्ध झालं होतं.

आता अदनान सामी ५० वर्षांचा झाला आहे. तसेच त्याने मेहनत घेऊन त्याच्या लठ्ठपणावर नियंत्रण मिळवले आहे. आता तो त्याच्या फिटनेसवर बऱ्यापैकी लक्ष देतो. तसेच आता त्याचे वजन जवळपास ७५ ते ८० किलो एवढे आहे.  

टॅग्स :अदनान सामीआरोग्य