Join us  

जेव्हा नरेंद्र चंचल यांना मिळाली होती खोटं बोलण्याची शिक्षा, दोन महिने बंद झाला होता आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 5:16 PM

होय, नरेंद्र चंचल यांनी स्वत: एका मुलाखतीत याबाबतचा एक किस्सा सांगितला होता.

ठळक मुद्देनरेंद्र चंचल  दरवर्षी न चुकता 29 डिसेंबरला ते वैष्णोदेवीला जात आणि वर्षाच्या अखेरच्या दिवशी परफॉर्मही करत.

लोकप्रिय भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे आज दुपारी दीर्घआजाराने निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला.नरेंद्र चंचल यांचा जन्म 16 आॅक्टोबर 1940 रोजी अमृतसरमध्ये एका धार्मिक पंजाबी कुटुंबात झाला.  एका धार्मिक वातावरणात मोठे झाले, ज्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच भजन कीर्तन गाणे आवडत होते. त्यामुळे फार लहान वयात त्यांनी मातेच्या जागरण सोहळ्यात गायला सुरुवात केली होती.

असे म्हणतात की, नरेंद्र आपल्या शाळेय जीवनात खूप  खोडकर स्वभावाचे होते. त्यामुळे शाळेतील शिक्षक त्यांना चंचल नावाने बोलवायचे. पुढे नरेंद्र यांनी हेच नाव स्वीकारले आणि नरेंद्र चंचल या नावाने ओळखले जाऊ लागलेत.अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळाली होती. राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बॉबी’ या सिनेमासाठी त्यांनी पहिले गाणे गायले होते. यासाठी त्यांनी बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर अवार्ड जिंकला होता. ‘बॉबी’ हिट झाला आणि नरेंद्र चंचल या यशाने हुरळून गेले. इतके की, यानंतर मातेच्या जागरण सोहळ्यांत गाण्याचे त्यांनी सोडून दिले होते. पुढे याची शिक्षाही त्यांना मिळाली होती.

अन् घशातून आवाजच निघेना झाला...होय, नरेंद्र चंचल यांनी स्वत: एका मुलाखतीत याबाबतचा एक किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, ‘एकदा मी काली मातेच्या मंदिरात गेलो होतो. तिथे लोकांनी मला गाण्याचा आग्रह केला. पण मी माझी तब्येत ठीक नाही, असे खोटं सांगून वेळ मारून नेली. घरी आल्यावर अचानक माझा आवाज गेल्याचे माझ्या लक्षात आले. घशातून आवाजच निघेना झाला. मी चिंतीत झालो. दोन महिने आवाज बंद आहे म्हटल्यावर एकदिवस मी त्याच काली मातेच्या मंदिरात पोहोचलो. काली मातेसमोर नतमस्तक होत मी माफी मागितली. मी खोटं बोललो, मला क्षमा कर म्हणून गयावया केली. मंदिरात यज्ञ सुरु होता आणि सर्व भक्तांना पेढ्याची लस्सी प्रसाद म्हणून वाटली जात होती. मला ही लस्सी प्यायला दिली गेली आणि चमत्कार म्हणजे, त्यानंतर माझा आवाज परत आला. यानंतर मातेच्या जागरण सोहळ्यात गाण्याला कधीही नकार देणार नाही, असा प्रणच मी केला.’

नरेंद्र चंचल  दरवर्षी न चुकता 29 डिसेंबरला ते वैष्णोदेवीला जात आणि वर्षाच्या अखेरच्या दिवशी परफॉर्मही करत.

टॅग्स :बॉलिवूड