इंदर कुमारचे काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. एवढेच नव्हे तर एकता कपूरच्या क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत तो मिहिरच्या भूमिकेत झळकला होता. इंदर गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय होता. बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबतची त्याची मैत्री सर्वश्रृत होती. ‘वॉन्टेड’ आणि ‘तुमको ना भूल पाएंगे’ या चित्रपटात सलमानसोबत झळकलेल्या इंदरचा करिअर ग्राफ तसा डगमगळीतच राहिला. चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या इंदरच्या आयुष्यात एक काळ असा होता की, तो प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला होता. इंदर कुमारने त्याच्या करिअरची सुरुवात १९९६ मध्ये ‘मासूम’ या चित्रपटातून केली होती. मात्र दुर्दैवाने हा चित्रपट फ्लॉप ठरल्याने त्याचा त्याच्या करिअरला काहीच फायदा झाला नाही. वास्तविक इंदरला सुपरस्टार म्हणून इमेज तयार करायची होती, परंतु मुख्य अभिनेता म्हणून त्याला फारसे पसंत केले गेले नसल्याने त्याने सहायक अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इंडस्ट्रीत ओळख निर्माण करण्यासाठी अनेक वर्षं त्याची धडपड सुरू होती. सहाय्यक अभिनेता म्हणूनच त्याच्या वाट्याला भूमिका येत गेल्या. मधल्या काळात तर त्याचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल फ्लॉप ठरू लागले. आपल्याला एखादी चांगली भूमिका मिळेल आणि एक अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करू असे त्याला नेहमीच वाटत होते. पण २००२ मध्ये मसीहा या चित्रपटाचे चित्रीकरण करताना त्याला एक अपघात झाला आणि त्यामुळे तो कित्येक महिने बिछान्यावरच होता. या अपघातामुळे त्याच्या करियरला ब्रेक लागला होता. त्याला या चित्रपटातील एका दृश्यात हेलिकॉप्टरमधून उडी मारायची होती. हे दृश्य अतिशय कठीण असल्याने त्याने बॉडी डबलची मदत घ्यावी असे त्याला चित्रपटाच्या टीममधील सगळे सांगत होते. पण त्याने हे दृश्य स्वतःच देण्याचे ठरवले. पण हेलिकॉप्टरमधून उडी मारताना त्याच्या दोन्ही गुडघ्यांना जबरदस्त मार लागला. ही दुखापत इतकी गंभीर होती की, यानंतर सहा महिने तो चालू देखील शकला नव्हता. या अपघातानंतर त्याला चित्रपटसृष्टीत कमबॅक करायला जवळजवळ दोन वर्षं लागले होते. पण त्या दरम्यान लोकांना त्याचा विसर पडला होता. त्यामुळे त्याला काम मिळणे बंद झाले. अशाप्रकारे त्याच्या करियरला ब्रेक मिळाला होता.
या कारणामुळे इंदर कुमारच्या करियरला लागला होता ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 07:00 IST