Join us  

"मी १८ वर्षांची असताना करण जोहरने...", बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल दिशा पटानी स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 11:40 AM

दिशा पटानीने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर थेट भाष्य केलं. याबरोबरच तिने नेपोटिझमवरुन बॉलिवूडला ट्रोल करणाऱ्यांनाही सुनावलं. 

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या आगामी 'योद्धा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दिशा पटानीबरोबर या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशी खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने केली आहे. 'योद्धा' सिनेमाच्या ट्रेलरला संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. यावेळी दिशा पटानीने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर थेट भाष्य केलं. याबरोबरच तिने नेपोटिझमवरुन बॉलिवूडला ट्रोल करणाऱ्यांनाही सुनावलं. 

दिशा पटानीने ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचं कौतुकही केलं. दिशा म्हणाली, "आज जर मी अभिनेत्री आहे तर ती केवळ करण जोहर सरांमुळेच आहे. मी जेव्हा मॉडेलिंग करत होते. तेव्हा करण सरांनी मला पाहिलं होतं. मी तेव्हा केवळ १८ वर्षांची असेन.  जेव्हा लोक नेपोटिझम बोलतात तेव्हा मला त्यांना सांगावसं वाटतं की मी एक आऊटसाइडर आहे. तरीही करण सरांनीच मला ही संधी दिली आहे." दिशाचं हे बोलणं ऐकून करणही भारावून गेला. करणने दिशाला "आय लव्ह यू" म्हणत मिठी मारली. 

दिशा पटानीने २०१६ साली 'एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती 'बाघी २', 'भारत', 'मलंग', 'एक विलन रिटर्न' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकली. आता दिशा 'कल्की 2898 AD', 'योद्धा', 'वेलकम टू द जंगल' या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा योद्धा हा सिनेमा १५ मार्चला सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. पुष्कर ओझा, सागर आंब्रे यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.  

टॅग्स :दिशा पाटनीकरण जोहरसेलिब्रिटी