Join us  

सायरा बानू यांनी ट्विटरवर शेअर केला हा खास फोटो, हे आहे या फोटोमागचे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 3:04 PM

सायरा बानू यांनी दिलीप कुमार आणि त्यांच्या फॅन्सचे आभार मानण्यासाठी ट्विटरवर एक ट्वीट पोस्ट केले आहे. तसेच या पोस्टसोबत त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे.

सायरा बानू आणि दिलीप कुमार यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच झाला. या निमित्ताने त्यांच्या फॅन्सने सोशल मीडियाद्वारे त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. सायरा बानू यांनी दिलीप कुमार आणि त्यांच्या फॅन्सचे आभार मानण्यासाठी ट्विटरवर एक ट्वीट पोस्ट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, माझे कोहिनूर, साहेब, माझ्या स्वप्नातील राजकुमार युसूफ या फॅन्सचे मी आभार कसे मानू हेच मला कळत नाहीये. आज आपल्या लग्नाचा 52 वा वाढदिवस आहे. यावेळी या फॅन्सनी दिलेल्या शुभेच्छा खूपच मोलाच्या आहेत. यासोबत मी आमच्या दोघांचा एक फोटो पोस्ट करत आहे. हा फोटो माझा सगळ्यात आवडता आहे. हा फोटो खूपच छान असल्याचे त्यांच्या फॅन्सने देखील प्रतिक्रियांद्वारे सांगितले आहे. 

दिलीप कुमार आणि सायरा बानू यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. सायरा बानू आणि दिलीप कुमार यांच्यात वयाचे प्रचंड अंतर असले तरी  सायरा यांनी दिलीप कुमार यांना पाहताच क्षणी ठरवलं होतं की, मी लग्न करेल तर यांच्याशीच.

दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. सायरा बानो यांनी 1966मध्ये वयाच्या 22व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना मात्र त्यांच्या आणि सायरा यांच्यात असणाऱ्या वयाच्या अंतराबाबत ठाऊक होतं. लग्न करण्यासाठी अडून बसलेल्या सायराची समजूत घालण्यासाठी दिलीप सायराला म्हणालेही होते की, तू माझे पांढरे केस पाहिले आहेत का? पण सायराने दिलेल्या उत्तरावर दिलीप यांच्याकडे काहीही उत्तर नव्हतं. त्यानंतर दिलीप यांनीही सायरा यांच्याशी लग्न करण्यास होकार दिला. 

सायरा बानू यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्या आठ वर्षांच्या असल्यापासूनच दिलीप यांच्यावर प्रेम करत होत्या. 1952मध्ये रिलिज झालेल्या 'दाग' चित्रपटात दिलीप यांना पाहताच क्षणी त्या त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. 

सायरा बानू आणि दिलीप कुमार यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. 

 

 

टॅग्स :दिलीप कुमारसायरा बानू