Join us  

मुंबईतील या भूत बंगल्याबद्दल तुम्हाला माहितीय का?, इथं रहायला गेलेल्या कलाकारांचं फळफळलं होतं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 6:19 PM

एक इंटरेस्टिंग किस्सा आहे मुंबईतील भूत बंगल्याचा. या बंगल्यात राहायला गेलेले कलाकार सुपरस्टार झालेत.

बरेच लोक आपली स्वप्न उराशी बाळगून स्वप्ननगरी मुंबईत येतात. या शहरात येऊन आपल्या कौशल्याच्या आणि नशीबाच्या जोरावर आतापर्यंत अनेक जण इथे स्टार झाले आहेत. प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की त्यांच्या करिअरमध्ये त्यांना लोकप्रिय व्हायचे असते आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचे असते. यासाठी ते काहीही करायला तयार असतात. असाच एक इंटरेस्टिंग किस्सा आहे मुंबईतील भूत बंगल्याचा. या बंगल्यात राहायला गेलेले कलाकार सुपस्टार झालेत.

हा भूत बंगला आहे मुंबईच्या कार्टर रोडवर. ज्यामध्ये राजेश खन्ना आणि राजेंद्र कुमार यांचे नशीब बदलले होते. या दोन्ही स्टार्सनाही हा बंगला खूप आवडला होता. असे म्हणतात की, एकेकाळी या बंगल्याला 'भूत बंगला' म्हटलं जायचे. मात्र हाच बंगला त्यांच्यासाठी लकी ठरला होता.

बरेच वर्ष लोक कार्टर रोडवरील या बंगल्याला 'भूत बंगला' म्हणत होते. या बंगल्याचा मालक देखील कमी दराने हा बंगला विकायला तयार होता. त्याचवेळी राजेंद्र कुमार आपल्या कुटुंबासाठी चांगल्या घराच्या शोधात होते. मग त्यांना या घराबद्दल समजले आणि त्यांनी हे घर केवळ ६० हजार रुपयांमध्ये विकत घेतले होते. राजेंद्र कुमार यांनी या घराला आपल्या मुलीचे नाव दिले. या बंगल्याचे नाव त्यांनी 'डिंपल' ठेवले. या बंगल्यात रहायला येताच राजेंद्रकुमार यांचे नशीब बदलून गेले.

स्ट्रगल करणारे राजेंद्र कुमार यांचे चित्रपट सुपरहिट ठरू लागले. साठ-सत्तरच्या दशकात राजेंद्र कुमार यांचा बोलबाला होता. त्यांचे चित्रपट २५ आठवडे थिएटरमध्ये टिकायचे. या यशामागे राजेंद्र कुमार यांची मेहनतही होती. तर दुसरीकडे हा बंगलादेखील त्यांच्यासाठी लकी ठरत होता, असे ते म्हणायचे. त्यांच्या स्टारडमबरोबरच या बंगल्याचीही इंडस्ट्रीमध्येही बरीच चर्चा झाली.

काही काळानंतर चित्रपटसृष्टीत राजेश खन्ना यांनी एन्ट्री केली. राजेश यांनी हा बंगला खरेदी करण्याची इच्छा राजेंद्र कुमार यांच्यासमोर व्यक्त केली. कसे-बसे हा बंगला विकायला राजेंद्र कुमार तयार झाले. मात्र, राजेंद्र यांनी राजेश खन्ना यांच्या समोर एक अट ठेवली. त्यांना या बंगल्याचे नाव बदलावे लागेल अशी अट राजेश खन्ना यांच्या समोर त्यांनी ठेवली. त्यासाठी राजेश खन्नाही लगेच तयार झाले. राजेंद्र कुमार यांच्यानंतर जेव्हा राजेश खन्ना या घरात शिफ्ट झाले तेव्हा ते देखील यशाच्या शिखरावर पोहचले. त्यांचेही अनेक चित्रपट सुपरहिट ठरले.

तर दुसरीकडे हा बंगला सोडल्यानंतर राजेंद्रकुमार यांची प्रकृती बिघडू लागली. बंगला विकल्यानंतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज झाले होते. राजेश खन्ना यांनी राजेंद्र यांना या बंगल्याची रक्कम हप्त्यांमध्ये दिली. २०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हा बंगला 'ऑल कार्गो लॉजिस्टिक'चे अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांना ९० कोटींना विकला.

टॅग्स :राजेश खन्नाराजेंद्र कुमार