Join us  

​दीपिका पादुकोणला दिला पाठींबा पण ‘पद्मावती’बद्दल हे काय बोलून गेलेत नाना पाटेकर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 8:27 AM

आपल्या बेधडक आणि परखड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेता नाना पाटेकर यांनी ‘पद्मावती’ वादात उडी घेतली आहे. आज दिल्लीत संसदेच्या ...

आपल्या बेधडक आणि परखड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेता नाना पाटेकर यांनी ‘पद्मावती’ वादात उडी घेतली आहे. आज दिल्लीत संसदेच्या स्थायी समितीसमोर ‘पद्मावती’चे भविष्य निश्चित होणार असताना इकडे नाना पाटेकर यांनी या चित्रपटाच्या विरोधात सूर आवळला आहे. ऐतिहासिक चित्रपट तथ्यांवर आधारितच असायला हवेत. या तथ्यांशी कुठलीही छेडछाड होता कामा नये, असे त्यांनी म्हटले आहे.आज पुण्यात एनडीएच्या दीक्षांत समारंभाला नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. मी चित्रपट पाहिलेला नाही. मनोरंजनासाठी सिनेमे बनवले जातात. पण ऐतिहासिक चित्रपटात तथ्यांची मोडतोड होता कामा नये. समाजात तणाव निर्माण होता कामा नये. माझ्या कुठल्याही चित्रपटावरून अद्याप वाद झालेला नाही. खरे तर ‘बाजीराव मस्तानी’मध्ये गाणे नको होते. पण ते आपण पाहिले. अशात काय केले जाऊ शकते? असा   प्रश्न नाना पाटेकर यांनी यावेळी केला.अर्थात ‘पद्मावती’च्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांना मिळत असलेल्या धमक्यांची त्यांनी निंदा केली. असा विरोध निंदनीय आहे. जे लोक भन्साळींना जीवे मारण्याची धमकी देत आहेत, दीपिकाचे नाक कापण्याची भाषा करत आहेत, त्यांना मी समर्थन देऊ शकत नाही. अशा चिथावणीखोर भाषेचा वापर चुकीचा आहे, असे ते म्हणाले.ALSO READ : ‘पद्मावती’वरून रान पेटले असतानाच संजय लीला भन्साळी करणार मोठ्ठा धमाका! रिलीज होणार दुसरा ट्रेलर!!‘पद्मावती’वरून देशभर रान माजले आहे. देशभर चित्रपटाला विरोध होतो आहे. राजकीय पक्ष, अनेक राजपूत संघटना व राजस्थानातील काही राजघराण्यांनी या चित्रपटाच्या रिलीजला विरोध केला आहे. काहींनी तर थेट भन्साळींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या चित्रपटात  राणी पद्मावतीची भूमिका साकारणाºया दीपिका पादुकोणलाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे रिलीज लांबणीवर टाकण्यात आले आहे. आतापर्यंत सहा राज्यांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.   ब्रिटनमधील सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ला हिरवा कंदील दाखवला आहे. तथापि, भारतीय सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिल्यानंतरच भारताबाहेर  चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय ‘पद्मावती’च्या निर्मात्यांनी घेतला आहे.