Join us  

छपाक!! दीपिका पादुकोणने केले ‘स्टिंग ऑपरेशन’, समोर आले धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:24 AM

Chhapaak Movie : ‘अगर ये (अ‍ॅसिड) बिकता नहीं तो फिकता नहीं’, असा एक संवाद ‘छपाक’ या चित्रपटात आहे. पण देशातले वास्तव काय आहे?

ठळक मुद्दे अ‍ॅसिड विकण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कडक निर्बंध घालून दिले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा नुकताच ‘छपाक’ सिनेमा प्रदर्शित झाला.  अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा सध्या चांगले प्रदर्शन करतोय. ‘अगर ये (अ‍ॅसिड) बिकता नहीं तो फिकता नहीं’, असा एक संवाद या चित्रपटात आहे. पण देशातले वास्तव काय आहे? नेमके हेच जाणून घेण्यासाठी दीपिका पादुकोण व तिच्या टीमने एक स्टिंग ऑपरेशन केले आणि एक भयावह वास्तव समोर आले. 

होय, दीपिकाने आपली एक टीम तयार केली.  या टीममधील प्रत्येक सदस्याला वेगवेगळ्या भागांत पाठवून त्यांना दुकानातून  अ‍ॅसिड खरेदी करण्यास सांगितले गेले. भयावह म्हणजे, एक-दोन दुकानदार वगळता सर्वांनीच अगदी बेधडकपणे अ‍ॅसिड विकले. एका दिवसात दीपिकाच्या टीमने जवळपास 24 अ‍ॅसिडच्या बाटल्या खरेदी करून आणल्या. केवळ एका दुकानदाराने अ‍ॅसिड मागणा-यास त्याचा आयडी विचारला. उर्वरित सर्व दुकानदारांनी आयडी वगैरेच्या भानगडीत न पडता अगदी सहज अ‍ॅसिडची बाटली मागणा-याच्या हातात टिकवली. काही दुकानदारांनी तर चक्क अ‍ॅॅसिडसाठी ज्यादा पैशांची मागणी केली. दीपिकाने या स्टिंग ऑपरेशनचे नेतृत्व केले. ती कारमध्ये बसून हे स्टिंग ऑपरेशन कंट्रोल करत होती.

 अ‍ॅसिड विकण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कडक निर्बंध घालून दिले आहेत. त्यानुसार, अ‍ॅसिड खरेदी करणारी व्यक्ती 18 वर्षांची असली पाहिजे. अ‍ॅसिड खरेदी करताना त्याला स्वत:चे आयडी प्रूफ, रेसिडेन्सीअल प्रूफ विचारणे गरजेचे आहे. शिवाय जो दुकानदार अ‍ॅसिड विकतो, त्याच्याकडेही अ‍ॅसिड विकण्याचा परवाना असणे बंधनकारक आहे. एवढेच नाही तर अ‍ॅसिड विकल्यानंतर पोलिसांना त्याबद्दलची माहिती देणेही गरजेचे आहे. पण दीपिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अगदी सर्रास या निर्बंधाना डावलून अगदी बेधडक प्रसंगी ज्यादा दाम वसूल करून अ‍ॅसिडची विक्री होताना दिसली.

टॅग्स :दीपिका पादुकोणछपाक