Join us

​‘दंगल’ने प्रदर्शनापूर्वीच केली ७५ कोटींची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 15:03 IST

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘दंगल’ या सिनेमाची सगळ्यांनाच प्रतीक्षा लागून राहिली असताना एक मोठी बातमी आहे. होय, ...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘दंगल’ या सिनेमाची सगळ्यांनाच प्रतीक्षा लागून राहिली असताना एक मोठी बातमी आहे. होय, ‘दंगल’ या चित्रपटाचे सॅटेलाईट राईट्स तब्बल ७५ कोटी रूपयांना विकले गेले आहेत. यापूूर्वी सोनी ग्रूपने‘धूम ३’ या चित्रपटाचे सॅटेलाइट राइट्स ६५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता  झी ग्रूपने ‘दंगल’चे राईट्स तब्बल ७५ कोटींना विकत घेतले आहेत.  आजवरच्या सॅटेलाइट विक्रीमधला हा सर्वाधिक मोठा व्यवहार मानला जात आहे. तज्ज्ञांचे मानाल तर गत दोन वर्षांमध्ये चित्रपटांच्या सॅटेलाइट राइट्सच्या दरांमध्ये ४० ते ४५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. पण ‘दंगल’ने मात्र प्रदर्शनाआधीच बाजी मारली आहे. ‘दंगल’ हा आमिर खान, यू टीव्ही मोशन पिक्चर्स आणि वॉल्ट डिस्ने यांची निर्मिती आहे. अर्थात या तिन्ही निर्मात्यांपैकी आमिरच यामधील महत्त्वाचा निमार्ता आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये आमिरची जवळपास ७० टक्क्यांची भागीदारी आहे. लवकरच प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता बॉक्सआॅफिसवर किती कमाई करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’मध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. कुस्ती हे पुरुषांची मक्तेदारी असलेले क्षेत्र मानल्या जाते. महावीर सिंह यांनी मात्र पुरूषांची ही मक्तेदारी मोडत काढत आपल्या मुलींना कुस्तीच्या आखाड्यात उतरवले. याच महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेमध्ये आमिर झळकणार आहे.  साक्षी तन्वर आमिरच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये झळणार असून फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी आमिरच्या मुलींची म्हणजेच गीता आणि बबिताची भूमिका साकारली आहे.