Join us  

Corona Effect : कोरोनामुळे आणखीन एका अभिनेत्रीचं कॅन्सल झालं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:25 PM

कोरोना व्हायरसमुळे काहींच्या खासगी आयुष्यावरही परिणाम झाला आहे.

जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे सगळीकडे भीतीचं सावट आहे. कोरोना व्हायरसमुळे सिनेमा व मालिकांचं शूटिंग रद्द करण्यात आलं आहे. एकीकडे या व्हायरसमुळे लोकांच्या प्रोफेशनल लाइफमुळे समस्या येत आहेत तर दुसरीकडे काहींच्या खासगी आयुष्यावरही परिणाम झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार तमीळ अभिनेत्री उत्तरा उन्नीने कोरोना व्हायरसमुळे लग्न रद्द केले आहे.उत्तरा उन्नी तमीळ व मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तरा व नितेेश नायर पुढच्या महिन्यात लग्न करणार होते. मात्र दोघांनी कोरोना व्हायरसमुळे लग्न रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. उत्तराने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

उत्तराने लिहिलं की, जगात कोरोना व्हायरसच्या साथीच्या प्रादुर्भावाचा उद्रेक होत आहे. जोपर्यंत ही स्थिती कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही आमचं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सगळ्यांची माफी मागतो ज्यांनी आमच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आधीपासून तिकिट बुक केले होते. आम्ही त्याच दिवशी मंदिरात अनुष्ठान थली केतू समारोह करणार आहोत. तुम्हा सगळ्यांना आगामी तारखेबद्दल सांगत राहू. सर्वजण सुरक्षीत रहा आणि स्वतःची काळजी घ्या.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरसने आत्तापर्यंत 6 हजारांवर लोकांचा जीव घेतला असून आत्तापर्यंत दीड लाखांवर लोकांना या व्हायरसची लागण घातली आहे. भारतातही हा व्हायरस वेगाने फोफावत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यालग्न