Join us

Cirkus Movie Review : रणवीर सिंगचा मल्टीस्टारर 'सर्कस' चित्रपट पाहायचा विचार करताय का?, मग वाचा हा रिव्ह्यू

By संजय घावरे | Updated: December 23, 2022 16:18 IST

Cirkus Movie Review : जाणून घ्या कसा आहे, रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनीत सर्कस चित्रपट

कलाकार - रणवीर सिंग, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, संजय मिश्रा, अनिल अमरजीत, जॅकलीन फर्नांडीस, पूजा हेगडे, सुलभा आर्या, जॉनी लिव्हर, विजय पाटकर, मुकेश तिवारी, बृजेंद्र काला, वृजेश हिरजी, मुरली शर्मा, टिकू तल्सानिया, उदय टिकेकर, अश्विनी काळसेकरदिग्दर्शक - रोहित शेट्टीनिर्माता - रोहित शेट्टी, भूषण कुमारकालावधी - दोन तास १९ मिनिटेस्टार - तीन स्टारचित्रपट परीक्षण - संजय घावरे

हा जरी रोहित शेट्टीचा सिनेमा असला तरी धडाकेबाज फाईट सीन्स आणि हवेत उडणाऱ्या गाड्या नाहीत. हा सिनेमा रोहितच्या नेहमीच्या जॉनरपेक्षा खूप वेगळा असल्यानं त्यानं त्याच प्रकारची ट्रीटमेंटही दिली आहे. विल्यम शेक्सपियर्स यांच्या 'द कॅामेडी ऑफ एरर्स' या नाटकावरून प्रेरीत होऊन बनवलेला हा चित्रपट पाहताना पावलोपावली संजीव कुमार आणि देवेन वर्मा यांच्या 'अंगूर' या गाजलेल्या चित्रपटाची आठवण येते. 

कथानक : चित्रपटाची कथा रॉय आणि जॉय हे दोन भाऊ आणि त्यांचे डुप्लिकेटस यांच्यावर आधारलेली आहे. एक रॉय हा मुंबईतील श्रीमंत तरुण बिंदूवर प्रेम करत असतो. तर दुसरा रॅाय हा उटीमध्ये सर्कसमध्ये काम करणारा करंट मॅन असून, मालासोबत त्याचा विवाह झालेला आहे. श्रीमंत रॉय आणि करंट मॅन रॉय यांच्यात काहीतरी कनेक्शन आहे. करंट मॅन जेव्हा विजेच्या तारा हातात घेतो तेव्हा श्रीमंत रॉयच्या अंगातही वीज संचारते आणि त्या वीजेचा शॅाक त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला बसतो. या दोघांसोबत जॉय नावाचे दोन भाऊही आहेत. चहाची बाग खरेदी करण्यासाठी मुंबईतील रॉय जॉयसोबत उटीला जातो. दोघांची नावं सारखी असल्यामुळे मुंबईतील रॉय उटीला पोहोचल्यावर सर्व त्याला करंट मॅन रॅाय समजतात. त्यानंतर जी धमाल उडते ती चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन - या चित्रपटात वल्ली असणाऱ्या व्यक्तींचं दर्शन घडतं. यापूर्वी गाजलेलाच फॅार्म्युला रोहितनं आपल्या शैलीत सादर करताना तो कलरफुल दिसावा याची पुरेपूर काळजी घेतली आहे. संवाद लेखन सुरेख असून, राय बहादूरच्या भूमिकेतील संजय मिश्रांच्या वाट्याला अफलातून डायलॅाग्ज आले असून, त्यावर त्यांनी चौफेर केलेली फटकेबाजी हास्याची कारंजी फुलवतात. त्यावर त्यांचा ड्रायव्हर असलेल्या अनिल चरणजीतनं परफेक्ट रिएक्शन देत धमाल केली आहे. यातील प्रत्येक कॅरेक्टर वल्ली आहे. जुन्या गाण्यांचा सुरेख वापर केला आहे. दीपिका पादुकोणच्या गाण्याचा 'करंट' जबरदस्त असून, त्यापुढे मुख्य नायिका झाकोळल्या जातात. पार्श्वसंगीत, कॅमेरावर्क, संकलन चांगलं आहे. व्हिएफक्सची बाजू थोडी लंगडी वाटते. खूपच प्राथमिक दर्जाचे व्हिएफएक्स पहायला मिळतात. कॅास्च्युमवर काम करायला हवे होते. काळानुरूप कॅास्च्युम आणि हेअर स्टाईल नाही. कला दिग्दर्शनातही बऱ्याच उणीवा जाणवतात. अखेरीस दिलेला संदेश अपील होत नाही.

अभिनय : पुन्हा एकदा रणवीर सिंगच्या अभिनयाची जादू पहायला मिळते. त्याचं फिजिक्स आणि अभिनय मोहित करते. वरुण शर्माला खूप मोठा ब्रेक मिळाला असून, त्यानं संधीचं सोनं केलं आहे. संजय मिश्रांनी साकारलेला राय बहादूर माईंड ब्लोइंग असून, त्याला अनिल अमरजीतची सुरेख साथ लाभली आहे. सिद्धार्थ जाधवनेही तूफान फटकेबाजी केली आहे. इतके सिनेमे करूनही जॅकलिन फर्नांडीस आणि पूजा हेगडे यांची अभिनयाची पाटी अद्याप कोरीच कशी हे कोडं उलगडण्यातलं नाही. सुलभा आर्या, जॅानी लिव्हर आणि विजय पाटकरांनी छोट्या भूमिकांमध्येही जीव ओतला आहे. मुकेश तिवारी, बृजेंद्र काला, वृजेश हिरजी, मुरली शर्मा, टिकू तल्सानिया, उदय टिकेकर, अश्विनी काळसेकर यांनीही चांगली साथ दिली आहे. 

सकारात्मक बाजू : पटकथा, संवादलेखन, अभिनय, नृत्य, गाणी, संगीत, दिग्दर्शन नकारात्मक बाजू : व्हिएफएक्स, कॅास्च्युम, कला दिग्दर्शन, अखेरचा मेसेज, सर्कसचा अभावथोडक्यात : शीर्षकावरून यात सर्कस पहायला मिळेल या आशेनं जाल तर फसाल. लॅाजिकलेस, धमाल, मनोरंजक आणि कलरफुल चित्रपट पाहण्याची इच्छा असेल तर 'सर्कस' नक्की बघा.

टॅग्स :रणवीर सिंगरोहित शेट्टीजॅकलिन फर्नांडिसपूजा हेगडेसिद्धार्थ जाधव