Join us  

जॅकी श्रॉफच्या हिरो चित्रपटासाठी चित्राला करायचे लोक गर्दी, त्याच्याच मुलाच्या या चित्रपटाच्या शो नंतर होणार चित्रपटगृह बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 2:24 PM

अनेकवेळा चित्रा या चित्रपटगृहाच्या तिकिटबारीवर हाऊसफुलचा बोर्ड झळकला आहे. सिंगल थिएटरच्या काळात तर चित्रपट चित्रपटगृहात पाहायला दादर आणि जवळच्या परिसरात राहाणाऱ्या लोकांची पहिली पसंती चित्रालाच असायची.

ठळक मुद्देटायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडेची मुख्य भूमिका असलेल्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाच्या शो नंतर हे चित्रपटगृह कायमचे बंद होणार आहे. विशेष म्हणजे टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांच्या हिरो या चित्रपटाला चित्रामध्ये हाऊसफुलचा बोर्ड लागला होता

एकेकाळी दादरमधील चित्रा चित्रपटगृह प्रचंड प्रसिद्ध होते. या चित्रपटगृहात गेल्या ३६ वर्षांपासून अनेक चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले आहेत. अनेकवेळा या चित्रपटगृहाच्या तिकिटबारीवर हाऊसफुलचा बोर्ड झळकला आहे. सिंगल थिएटरच्या काळात तर चित्रपट चित्रपटगृहात पाहायला दादर आणि जवळच्या परिसरात राहाणाऱ्या लोकांची पहिली पसंती चित्रालाच असायची. बॉलिवूडमधील कलाकारांचे अप-डाऊन जवळून पाहाणारे चित्रा हे चित्रपटगृह आता रसिकांचा निरोप घेणार आहे. 

टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडेची मुख्य भूमिका असलेल्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाच्या शो नंतर हे चित्रपटगृह कायमचे बंद होणार आहे. विशेष म्हणजे टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांच्या हिरो या चित्रपटाला चित्रामध्ये हाऊसफुलचा बोर्ड लागला होता आणि त्यांच्या मुलाच्या चित्रपटाच्या शेवटच्या शो नंतर हे चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड जाणार आहे. 

अनुराग, जंगली यांसारख्या अनेक बॉलिवूडमधील चित्रपटांची सिल्वर ज्युबली चित्रामध्ये झाली आहे. एवढेच नव्हे तर मराठी चित्रपटांचे देखील शो या चित्रपटगृहात व्हायचे. तसेच हे चित्रपटगृह दादरसारख्या मध्यवर्ती भागात असल्याने या ठिकाणी अनेक मराठी चित्रपटांचे प्रिमियर, चित्रपटांचे फर्स्ट लूक देखील होत असत. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या शुभ मंगल सावधान या चित्रपटाचा प्रिमियर देखील याच ठिकाणी झाला होता. तसेच मकरंद देशपांडेच्या सॅटर्डे सण्डे या चित्रपटाचा फर्स्ट लूक आमिर खानच्या उपस्थितीत चित्रा मध्ये पार पडला होता. पण आता हे चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी मिड डे वर्तमानपत्राने वृत्त दिले असून त्यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, या चित्रपटगृहात स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाचा  शेवटचा शो असणार आहे. हे चित्रपटगृह पी.डी. मेहता यांचे पुत्र दारा मेहता सांभाळत होते. पण मल्टीप्लेक्समुळे गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षक खूपच कमी संख्येने या चित्रपटगृहाकडे वळत आहेत आणि त्याचमुळे त्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या तोट्यामुळे आता त्यांनी हे चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :मुंबई