Join us  

टीचर, टीचर, वो अर्नब मुझे गाली दे रहा है...! ‘बॉलिवूड स्ट्राईक बॅक’ची राम गोपाल वर्मांनी उडवली खिल्ली

By रूपाली मुधोळकर | Published: October 13, 2020 6:05 PM

बॉलिवूडने मीडिया हाऊसेसविरोधात कोर्टात जाणे म्हणजे, निव्वळ बालीशपणा असल्याचे राम गोपाल वर्मा म्हणाले.

ठळक मुद्दे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही मीडिया ट्रायलविरोधात कोर्टात जाणा-या बॉलिवूडकरांवर निशाणा साधला.

बॉलिवूडमध्ये काल सोमवारी एक अनपेक्षित घटना घडली. घटना काय, तर बेजबाबदार आणि अपमानास्पद वृत्तांकन करणा-या दोन टीव्ही वाहिन्यांविरोधात बॉलिवूडचे 34 प्रॉडक्शन हाऊसेस कोर्टात गेलेत. यानंतर सोशल मीडियावर ‘बॉलिवूड स्ट्राईक बॅक’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला. साहजिकच बॉलिवूडने उचलेल्या या पावलावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांची प्रतिक्रिया या सगळ्यांमध्ये लक्षवेधी ठरली. बॉलिवूडने मीडिया हाऊसेसविरोधात कोर्टात जाणे म्हणजे, निव्वळ बालीशपणा असल्याचे राम गोपाल वर्मा म्हणाले.

काय म्हणाले वर्मा

यासंदर्भात रामगोपाल वर्मा यांनी एक ट्विट केले. ‘बॉलिवूडकडून आलेली ही प्रतिक्रिया मुळातच थंड व विलंबाने आलेली प्रतिक्रिया आहे. चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेणे हणजे एका शाळेतल्या मुलाने शिक्षकाकडे जाऊन, ‘टिचर, टिचर, तो अर्णब मला शिवी देतोय, असे तक्रार करण्यासारखे आहे,’ असे ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केले.

कंगनानेही केली टीका

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कमालीच्या आक्रमक झालेल्या  कंगना राणौत हिने बॉलिवूडला पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले. बॉलिवूड इंडस्ट्री ही ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार झाले आहे, अशी टीका कंगनाने केली आहे.बॉलिव़ूड ड्रग्स, शोषण, नोपोटिझम आणि जिहादचे गटार बनले आहे. मात्र त्याला साफ करण्याऐवजी बॉलिवूड स्ट्राइक्स बॅकसारख्या हॅशटॅगचा वापर केला जात आहे. मी तर म्हणते माझ्यावरही खटला दाखल करा. जोपर्यंत जिवंत राहीन तोपर्यंत तुम्हा सगळ्यांचं पितळ उघडं पाडत राहीन, असे कंगना म्हणाली.

संस्कृतीची वाट लावणार्‍या बॉलिवूडविरोधात केस होऊ शकेल का? विवेक अग्निहोत्रींचा ‘सवाल’

विवेक अग्निहोत्री यांचा थेट निशाणा  दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही मीडिया ट्रायलविरोधात कोर्टात जाणा-या बॉलिवूडकरांवर निशाणा साधला. भारताचे संगीत, भाषा, कला, रचनात्मकता आणि भारतीय संस्कृतीची वाट लावल्याबद्दल बद्दल देशाची जनता बॉलिवूडवर खटला दाखल करू शकेल काय? असे ट्विट विवेक अग्निहोत्रीने केले.  

‘’बॉलिवूड ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार,’’ कंगना राणौतचा पुन्हा एकदा वार

दोन चॅनल्सविरोधात ‘बॉलिवूड’ कोर्टात

बॉलिवूडमधील लोक अमली पदार्थांचे व्यसनी तसेच मलीन प्रतिमेचे आहेत, असा उल्लेख टाइम्स नाऊ, रिपब्लिक टीव्हीने सुशांतसिंह राजपूत प्रकरणी करून बेजबाबदार पद्धतीने वृत्तांकन केले, अशा तक्रारी करणारी याचिका आमीर खान, शाहरूख खान, सलमान खान, अजय देवगण आदी दिग्गज कलाकार व निर्माते, चित्रपट क्षेत्रातील विविध संघटनांनी केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे.या प्रकरणात दाद मागणाऱ्यांमध्ये करण जोहर, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर आदी नामवंतांचाही समावेश आहे. रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी तसेच टाइम्स नाऊचे राहुल शिवशंकर, नविकाकुमार यांच्या विरोधात न्यायालयात या कलाकारांनी दाद मागितली आहे. या वृत्तवाहिन्यांनी बॉलिवूडसाठी ओंगळ, व्यसनी अशा अपशब्दांचा वापर चालविलेला आहे, असा आरोप या याचिकेत आहे. बॉलिवूडमध्ये घाण असून ती साफ करण्याची गरज आहे, अशी प्रक्षोभक भाषा या वृत्तवाहिन्यांनी वापरल्याचा आरोप केला आहे. सुशांतप्रकरणी माध्यमांनी कायद्याचा भंग होईल, असे वृत्तांकन करू नये, असा आदेश द्यावा, अशी विनंती केलीे.

टॅग्स :राम गोपाल वर्माबॉलिवूड