Join us  

 अनुष्का शर्मावर रासुका लावा...! ‘पाताललोक’ नव्या वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 1:36 PM

‘पाताललोक’ ही अनुष्काची पहिलीच वेबसीरिज. आता त्यावरून नवा वाद उफाळून आला आहे़ काय आहे हा वाद?

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून  सोशल मीडिया युजर्सनी ‘पाताल लोक’वर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. 

अनुष्का शर्माची ‘पाताललोक’ ही वेबसीरिज रिलीज झाली आणि अनुष्का चर्चेत आली. अनुष्काची निर्मिती असलेली ही वेबसीरिज आधी लोकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. पण नंतर ती वादातही सापडली़ एक नाही तर अनेक वादात. होय, आता अनुष्काने प्रोड्यूस केलेल्या या वेबसीरिजच्या निमित्ताने आणखी एका वादाने डोके वर काढले असून, अनुष्कावर रासुकाअंतर्गत (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) कारवाई करण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावर ‘पाताललोक’ या वेबसीरिजवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असताना लॉयर्स गिल्डचे सदस्य वीरेन सिंग गुरुंग यांनी या सीरिजसंदर्भात अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली होती. वेबसीरिजमध्ये जाती सूचक शब्दांचा वापर केला असल्याचा आरोप त्यांनी या नोटीसमध्ये केला होता. आता भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी ‘पाताललोक’ प्रकरणी अनुष्काविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुर्जर यांनी अनुष्कावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

काय आहे आरोप

अनुष्का शर्माने एका वॉन्टेड माफियासोबत माझा फोटो वापरला. माझ्या परवानगीशिवाय हा फोटो वापरला गेला. केवळ इतकेच नाही तर गुर्जर समाजाविरोधात चुकीचे चित्रणही करण्यात आले, असे नंदकिशोर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अनुष्काविरोधात रासुकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.‘पाताललोक’ या वेबसीरिजमध्ये बालकृष्ण वाजपेयी नामक गुंडाशी संबंध असलेल्या नेत्यासोबत एका मार्गाचे उद्घाटन करताना नंदकिशोर व अन्य भाजप नेत्यांना दाखवले आहे.30 मार्च 2018 रोजी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सहापदरी रस्त्याचे उद्घाटन केले होते. गुर्जर यांच्या आरोपानुसार, या समारोहाचा फोटो पूर्व परवानगी न घेता ‘पाताललोक’मध्ये एडिट न करता वापरला गेला. या फोटो नंदकिशोर गुर्जरही दिसत आहेत.

कायदेशीर नोटीस

याआधी ‘पाताललोक’ प्रकरणी अनुष्काला कायदेशीर नोटीस पाठवली गेली आहे. वीरेन सिंह गुरुंग यांनी ही नोटीस पाठवत ही वेबसीरिज नेपाळी समुदायाचा अपमान करणारी असल्याचा दावा केला आहे.   वेबसीरिजच्या एका एपिसोडमध्ये 3 मिनिटं आणि 41 सेकंदांच्या एका दृश्यात एक महिला पोलिस नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीला जातीवादी शिव्या देते. वेबसीरिजमध्ये नेपाळी शब्द  वापरल्याबद्दल आम्हाला कोणतीही समस्या नाही. पण त्यानंतर जो शब्द वापरला गेला आहे त्याला त्यांचा विरोध आहे. नेपाळी भाषा ही 22 अनुसूचित भाषांपैकी एक आहे़ भारतात दीड कोटी लोक नेपाळी भाषा बोलतात. भारतात गोरखा समुदाय सर्वाधिक नेपाळी भाषा बोलणारा समुदाय आहे आणि या वेब सीरिजमध्ये वापरलेल्या या शब्दांमुळे त्यांचा अपमान झाला आहे. यासाठी अनुष्काने माफी मागायला हवी, असे वीरेन यांनी म्हटले आहे.   

बहिष्कार टाका 

गेल्या काही दिवसांपासून  सोशल मीडिया युजर्सनी ‘पाताल लोक’वर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.  दोन वेगवेगळ्या कारणांसाठी या सीरिजला विरोध होत आहे. एका गटाच्या मते, यातील अनेक दृश्ये हिंदूंच्या भावना दुखावणारी आहेत.  यात सीबीआय, सरकार, पोलिस आणि सरसकट सर्व हिंदूंना वाईट ठरवले आहेत. तर दुस-या एका गटाच्या मते, ही सीरिज इस्लामविरोधी आहे. इस्लामच्या धर्मग्रंथांना अतिरेकी साहित्याच्या रूपात दाखवण्याचा आरोप या गटाने केला आहे. ‘पाताल लोक’ या वेबसीरिजमध्ये जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय  नीरज काबी, इश्वाक सिंग, अभिषेक बॅनर्जी  वस्तिका मुखर्जी, गुल पनाग, विपिन शर्मा, आकाश खुराणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :पाताल लोकअनुष्का शर्मा