Join us  

Master Tito : राजेश खन्ना-अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा मास्टर टीटो सध्या काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 8:00 AM

Master Tito : अमिताभ व राजेश खन्नाची बालपणीची भूमिका म्हटलं की, आधी निर्मात्याला त्याच्याच नावाची आठवण व्हायची. त्याचं नाव काय तर मास्टर टीटो...

६० व ८० च्या दशकात बॉलिवूडच्या जणू प्रत्येक सिनेमाची सुरूवात व्हायची ती हिरोच्या बालपणापासून. होय, हिरो बालपणी कुटुंबापासून दुरावतो, मग मोठा झाल्यानंतर अचानक तो परततो. लहानपणी तो खूप भोगतो आणि मग मोठा झाल्यावर एकएकेकाचा सूड उगवतो, असे एक ना अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतीलच. राजेश खन्नाचा रोटी, अमिताभचा परवरिश, सुहाग, याराना, अमर अकबर अँथनी अशी कितीतरी नावं सांगता येतील. या व अशा चित्रपटात हिरोच्या बालपणीची भूमिका साकारणारे बालकलाकारही त्याकाळात खूप लोकप्रिय होते. असाच एक बालकलाकार त्याकाळात फारच लोकप्रिय झाला होता. अमिताभ व राजेश खन्नाची बालपणीची भूमिका म्हटलं की, आधी निर्मात्याला त्याच्याच नावाची आठवण व्हायची. त्याचं नाव काय तर मास्टर टीटो (Master Tito ).

 राजेश खन्ना यांचा 'रोटी' आणि अमिताभ बच्चन यांचा 'अमर कबर अँथनी' हे त्याकाळात प्रचंड गाजलेले सिनेमे. या दोन्ही चित्रपटात मास्टर टीटो यानेच हिरोच्या बालपणीची भूमिका साकारली होती. शशी कपूरसोबत 'आ गले लग जा' या सुपरहिट चित्रपटातही मास्टर टीटो झळकला होता. त्याकाळात बालकलारांना मास्टर आणि बेबी अशी उपाधी दिली जात असे. त्यामुळे टीटोलाही मास्टर टीटो म्हणूनच ओळखलं गेलं. त्याचं खरं नाव टीटो खत्री असं आहे. त्या काळात मास्टर टीटो हा लोकप्रिय कलाकार होता. घराघरात त्याला ओळखलं जाऊ लागलं होतं. पण जसा जसा मास्टर टीटो मोठा होऊ लागला, त्याची ओळखही पुसली गेली.  बालकलाकार म्हणून अफाट लोकप्रियता मिळवलेल्या टीटोला मोठं झाल्यावर मात्र हवं तसं यश मिळालं नाही. चित्रपटांमध्ये त्यांचा टिकाव लागू शकला नाही.

टीटोला मोठा हिरो बनायचं होतं. मात्र मुख्य अभिनेता बनण्याचं त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही. त्याला साईड रोलवरच समाधान मानावं लागलं. त्यांनतर हळूहळू तो जणू चित्रपटांमधून गायब झाला. चित्रपटसृष्टीत टिकाव लागणं कठीण वाटू लागल्यावर टीटोनं वेगळ्या क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.  

अभिनय क्षेत्राला रामराम ठोकत त्याने जाहिराती आणि टीव्ही मालिकांचं स्क्रिप्ट लेखन आणि दिग्दर्शन सुरु केलं आहे. इथे मात्र त्याला अपार यश मिळालं.  छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक असणाऱ्या कुबुल है, 'सपने सुहाने लडकपन के', 'रब से सोना इश्क' असे अनेक शो त्यानेच लाँच केले आहेत. सध्या टीटो काय करतो? तर तो Viacom 18 चे इनहाऊस डायरेक्टर आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनराजेश खन्नाशशी कपूरबॉलिवूड