Join us  

बॉलिवूडचा हा अभिनेता स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूसाठी मानतो दोषी, आजही त्या एका चुकीचा होतोय पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 11:40 AM

वडिलांच्या निधनामुळे अभिनेत्याला खूप मोठा धक्का बसला होता की, त्याला स्वतःला एकटे वाटू लागले.

बॉलिवूड अभिनेता संजय मिश्राने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. बिहारच्या दरभंगा येथे जन्मलेला अभिनेता व कॉमेडियन संजय मिश्राने मध्यंतरी अभिनय सोडले व उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे गेला होता. तिथे एका ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली होती. संजय त्याच्या वडिलांच्या निधनाने इतका दु:खी झाला होता की त्याने अभिनय सोडायचा निर्णय घेतला होता, असे सांगितले जाते. त्याच्या वडिलांच्या निधनाने त्याला खूप मोठा धक्का बसला होता की त्याला स्वतःला एकटे वाटू लागले. एका मुलाखतीत संजय मिश्राने त्याच्या वडिलांशी असलेल्या अटॅचमेंटबद्दल आणि त्यांचे किस्से सांगितले. 

संजय मिश्राचा आलू चाट हा चित्रपट २० मार्च २००९ मध्ये रिलीज झाला आणि ४ दिवसांनी म्हणजेच २४ मार्च रोजी संजयच्या वडिलांचे निधन झाले. संजयने सांगितले होते की हा चित्रपट रिलीज झाल्याच्या आनंदात माझ्या वडिलांनी त्याचे सर्व मित्र जमवले आणि सांगितले की आम्ही हा चित्रपट संजयसोबत बघू. त्याच वेळी मी आजारातून बरे होऊन हॉस्पिटलमधून घरी परतलो होतो. यानंतर आम्ही शेजारी असलेल्या एका मॉलमध्ये आलू चाट हा चित्रपट पाहायला गेलो. तिथे काही लोकांच्या गर्दीमध्ये मला घेरले आणि सेल्फी काढण्याचा आग्रह करू लागले. यावर मला राग आला आणि सिनेमा हॉलमध्ये रागाच्या भरात माझ्या तोंडून शिव्या निघाल्या. माझ्या वडिलांची त्यांच्याशी मैत्री असल्याने वडिलांना ही गोष्ट आवडली नाही. त्यानंतर मध्यांतरामध्ये वडिलांनी ही माझ्याकडे पाहिले नाही व मी ही वडिलांकडे पाहिले नाही, असे संजय मिश्राने सांगितले.

तो पुढे म्हणाला की, अडीच तासांनी सिनेमा संपला आणि आम्ही लिफ्टमधून खाली येत होतो. तेव्हा वडिलांनी मला सांगितले की, तुला त्यांच्यावर  ओरडायला नको होते. यावर मी रागाने म्हणालो की तुम्हाला काय माहित आहे? ओरडायला नको होते, तो तुमच्याबरोबर फोटो काढत होता का ? मी माझ्या वडिलांशी इतक्या मोठ्या आवाजात यापूर्वी कधीही बोललो नव्हतो.

संजय म्हणाला की आजारपणादरम्यान मला दिलेल्या अँटीबायोटिक्सचा डोस खूप जास्त दिला जात होता आणि नंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर थेट थिएटरमध्ये गेल्यानंतर लोकांचा गोंधळ. या सगळ्यामुळे मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकलो नाही आणि वडिलांवरही ओरडलो.

आम्ही वैशाली येथे राहतो. इंडिया गेटवर शूटिंग सुरू असताना मी ली मेरेडियन हॉटेलमध्ये थांबलो होतो. एक बिहारी कुक होता ज्याने मला विचारले की तुमच्यासाठी मीट बनवू का? यानंतर मी म्हणालो की उद्या बनव, मी माझ्या वडिलांना बोलावणार आहे. दुसऱ्या दिवशी मी माझ्या वडिलांना फोन केला आणि म्हणालो की मी गाडी पाठवतो, चांगले मीट बनवले आहे. यावर वडील चिडले आणि म्हणाले की तू खाऊ नकोस. तू अजून ठीक झाला नाहीस. हे सर्व खाऊन तुझी पुन्हा तब्बेत बिघडेल. त्यावर मी म्हणालो की बाबा रागावू नका. तुम्ही या पुन्हा इथेच थांबा. यानंतर मी कार पाठवली, पण गाडी एकटी आली आणि माझे वडील आलेच नाहीत, असे त्याने सांगितले.

संजयने पुढे सांगितले की, मी माझ्या वडिलांना फोन केला आणि विचारले की तुम्ही का आला नाही, मग ते म्हणाले की मला थोडे अस्वस्थ वाटत आहे. मग मी विचारले की तुम्ही काय खाल्ले होते? तू आला होतास जेव्हा तू हळू तुझ्या आईला सांगितले होते की काकळाची भाजी बनवायला. तर मी म्हणालो की तुम्ही त्या दिवसाची भाजी आज खाल्ली तर गडबड होणारच ना. यानंतर वडील म्हणाले की मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही. ही त्याची शेवटची ओळ होती. सकाळी कळले की वडील आता राहिले नाहीत.

संजयच्या वडिलांना डायरी लिहिण्याची खूप आवड होती. डायरीमध्ये दैनंदिनी लिहायचे आणि ज्या दिवशी आलू चाट बघायला गेलो त्या दिवशी ही लिहिले होते. डायरीमध्ये लिहले होते की मनोज पाहवाने खूप छान काम केले आहे, पण संजय मध्ये पण काहीतरी आहे. पण आज त्याने माझ्या मित्रांसमोर माझा अपमान केला. ते वाचल्यानंतर मला वाटले की माझे वडील माझ्याबद्दल काय घेऊन गेले?, ही खंत संजय मिश्राला वाटते आहे. संजय झाल्या या सर्व प्रकारामुळे स्वतःला दोषी समजतो. 

टॅग्स :संजय मिश्रा