Join us  

Birthday Special : म्हणून कमल हासन यांनी केले होते सारिकाशी लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 8:00 AM

साऊथ सुपरस्टार कमल हासन यांचा आज वाढदिवस. 1954 मध्ये आजच्याच दिवशी कमल हासन यांचा जन्म झाला होता.

ठळक मुद्देकमल व गौतमी 13 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले. पण 2016 मध्ये गौतमीने स्वत: कमल हासन यांच्यासोबतचे नाते तोडल्याचे जाहीर केले.

साऊथ सुपरस्टार कमल हासन यांचा आज वाढदिवस. 1954 मध्ये आजच्याच दिवशी कमल हासन यांचा जन्म झाला होता. 1959 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. पुढे हिरो म्हणून  एन्ट्री झाली आणि त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटात ते लीड हिरो म्हणून झळकले आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.  कालांतराने बॉलिवूडमध्येही त्यांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला.  

‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. यानंतर त्यांनी सागर,गिरफ्तार, जरा सी जिंदगी, राज तिलक, एक नई पहेली, चाची 420, हे राम अशा अनेक हिंदी सिनेमांत त्यांनी अभिनय केला. त्यांच्या सिनेमांइतकेच त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले.

कमल हासन यांच्या आयुष्यात अनेक महिला आल्यात. यापैकी दोघींशी त्यांनी लग्न केले. दोघींशी त्यांचे अफेअर चर्चेत राहिले. एकीसोबत ते 13 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले. पण काळासोबत ही सगळी नाती संपुष्टात आली. खरे तर कमल हासन यांचा विवाह संस्थेवर कधीच विश्वास नव्हता. विवाहसंस्थेवर माझा अजिबात विश्वास नाही असे कमल हासन यांनी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. ‘ लोक केवळ दबावामुळे लग्न करतात असे मला वाटते. माझ्या मनात असते तर मी कधीच लग्न केले नसते. केवळ माझ्या आयुष्यात असलेल्या स्त्रियांच्या इच्छेखातर मी लग्न केले. वाणीला लीव्ह इन मध्ये राहायचे नव्हते तर सारिका आणि मला दोन मुली झाल्यानंतरही हॉटेल रूम बुक करता येत नव्हती म्हणून आम्ही लग्न केले,’ असा खुलासा त्यांनी केला होता.

 

70च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबत कमल हासन यांचे अफेअर होते. दोघांनी काही सिनेमेसुद्धा एकत्र केले होते. मात्र फार काळ दोघांचे अफेअर टिकले नाही.

 

1978 साली कमल यांनी वाणी गणपतीसोबत पहिले लग्न केले होते. दहा वर्षे हे लग्न टिकले आणि 1988 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाचे कारण  होते सारिका.

वाणी गणपतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कमल हासन यांच्या आयुष्यात अभिनेत्री सारिकाची  एन्ट्री झाली. कमल आणि सारिका यांनी 1988 मध्ये लग्न केले. त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत.  पण 2004 मध्ये कमल सारिकापासूनही विभक्त झाले.

सारिकापासून दुरावल्यानंतर कमल हासन त्यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या सिमरनच्या प्रेमात पडले. त्यावेळी या नात्याची बरीच चर्चा झाली. पण सिमरने आपल्या बालपणीच्या मित्रासोबत लग्न केले आणि कमल हासन पुन्हा एकाकी पडले.

तिच्यानंतर गौतमी  कमल यांच्या आयुष्यात आली. कमल व गौतमी 13 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले. पण 2016 मध्ये गौतमीने स्वत: कमल हासन यांच्यासोबतचे नाते तोडल्याचे जाहीर केले. 

टॅग्स :कमल हासन