प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राकेश रोशन यांचा आज वाढदिवस. राकेश रोशन यांनी अनेक चित्रपटांत काम केले. पण ‘सुपरस्टार’ बनू शकले नाहीत. मात्र यात कुठलाही कमीपणा मानता राकेश रोशन सातत्याने काम करत राहिले. अगदी सहकलाकारची भूमिका असो किंवा एखाद्या नायिकाप्रधान चित्रपटातील नायकाची भूमिका असो. अभिनेता म्हणून राकेश रोशन यांच्या वाट्याला फार यश आले नाही. पण दिग्दर्शक म्हणून त्यांनी अपार यश मिळवले. कोयला, करण अर्जुन, कोई मिल गया, कहो ना प्यार है असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले.
राकेश रोशन यांनी मुंडण का केले, यामागे एक अतिशय रंजक किस्सा आहे. 1987 मध्ये राकेश यांनी ‘खुदगर्ज’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी राकेश यांनी तिरूपती बालाजीला एक नवस बोलला होता. हा चित्रपट हिट झाला तर केस अपर्ण करेल, असा नवस त्यांनी बोलला होता. पण ‘खुदगर्ज’ हिट झाला आणि राकेश रोशन हा नवस विसरले. पण पत्नी पिंकीने त्याना या नवसाची आठवण करून दिली. याचदरम्यान राकेश रोशन ‘खून भरी मांग’ हा सिनेमा बनवत होते. हा चित्रपटही हिट झाला आणि यानंतर राकेश रोशन यांनी आपला नवस फेडला.
सन 2000 मध्ये त्यांच्यावर अली बुदेश टोळीकडून जीवघेणा हल्ला झाला होता. सुदैवाने डाव्या हाताला एक गोळी लागली होती आणि एक छातीला घासून गेली होती. राकेश रोशन जमिनीवर पडल्यामुळे हल्लेखोर पळून गेले होते आणि त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले होते. ‘कहो ना प्यार है’ या सुपरहिट चित्रपटाच्या नफ्यामध्ये भागीदारी हवी असल्यामुळे बुदेश टोळीकडून हा हल्ला झाला होता.