Join us  

सलमान खान का म्हणतोय, प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेले असते दुःख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 5:49 PM

भारत या चित्रपटाचे पाचवे पोस्टर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या पोस्टरचा काळ हा 1990 मधील असून या पोस्टरमध्ये देखील सलमान आणि कतरिना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देया पोस्टरचा काळ हा 1990 मधील असून या पोस्टरमध्ये देखील सलमान आणि कतरिना दिसून येत आहेत. या पोस्टरसोबतच सलमानने म्हटले आहे की, प्रत्येक हसऱ्या चेहऱ्याच्या मागे एक दुःख लपलेले असते आणि हेच दुःख तुम्हाला जिवंत ठेवते.

सलमान खान आणि कतरीना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘भारत’ या चित्रपटाच्या ट्रेलरकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. सलमान खान या चित्रपटात वेगवेगळ्या सहा रूपात दिसणार आहे. यामुळे साहजिकच त्याचे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटांचे पोस्टर्स सलमान काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर करत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये सलमान खान एका आगळ्यावेगळ्या रूपात दिसला होता. पांढरे केस, पांढरी दाढी असा त्याचा या पोस्टरवरील लूक होता. ‘जितने सफेद बाल मेरे सर और दाढी में है, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही है,’ असा हा लूक शेअर करताना सलमानने लिहिले होते. सलमानचा हा लुक त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता. 

त्यानंतर भारत या चित्रपटाचे आणखी तीन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले होते. प्रत्येक पोस्टरमध्ये एक वेगळा काळ पाहायला मिळत आहे. पहिला पोस्टर हा 2010, दुसरा 1964, तिसरा 1970, चौथा 1985 या वर्षातील आहे. यातील एका पोस्टरमध्ये केवळ सलमान असून आणखी दोन पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना यांना पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचे पाचवे पोस्टर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या पोस्टरचा काळ हा 1990 मधील असून या पोस्टरमध्ये देखील सलमान आणि कतरिना दिसून येत आहेत. या पोस्टरसोबतच सलमानने म्हटले आहे की, प्रत्येक हसऱ्या चेहऱ्याच्या मागे एक दुःख लपलेले असते आणि हेच दुःख तुम्हाला जिवंत ठेवते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा सलमानच्या भारत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. भारतच्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजचा भारत कसा आहे, अशी या चित्रपटाची ढोबळ कथा आहे. येत्या २४ तारखेला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या तारखेविषयी कतरिना कैफने सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले होते.

या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफरने उत्तर भारताच्या विविध ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. हे लोकेशन्स निवडण्यासाठी ‘भारत’च्या टीमने अख्खा उत्तर भारत पालथा घातला होता. या चित्रपटात भाईजान सलमान खानसोबत कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. ईदच्या मुहूर्तावर ‘भारत’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत मर्यादित ठेवायचा नसल्यामुळे या चित्रपटाला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे.

टॅग्स :सलमान खान