Join us  

Brahmastra 2, 3 UPDATE: बापरे! ‘ब्रह्मास्त्र 2’ आणि ‘ब्रह्मास्त्र 3’साठी इतकी मोठी प्रतीक्षा? अयान मुखर्जीने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 1:48 PM

Brahmastra 2, 3 UPDATE: अयान मुखर्जीने शेअर केली अपडेट, सांगितली रिलीज डेट

Brahmastra 2, 3 UPDATE: ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट बनायला संपूर्ण 4 वर्षे लागलीत आणि त्याआधी 8 वर्षांपासून हा सिनेमा चर्चेत होता. पण सिनेमा रिलीज झाला अन् या सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलं. अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने केवळ पाचच दिवसांत 150 कोटींचा टप्पा पार केला होता. ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यानंतर साहजिकच ‘ब्रह्मास्त्र 2’ची (Brahmastra 2) चर्चा सुरू झाली होती. आता अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र 2’बद्दल एक मोठी घोषणा केली आहे. केवळ ‘ब्रह्मास्त्र 2’बद्दलचं नाही तर ‘ब्रह्मास्त्र 3’बद्दलही (Brahmastra 3) त्याने मोठी अपडेट दिली आहे.'ब्रह्मास्त्र'ला मिळालेलं प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून दिग्दर्शक अयान मुखर्जीनं 'ब्रह्मास्त्र'चे आणखी पार्ट येणार असल्याचं वचन दिलं होतं. आता त्याने याबद्दल मोठी अपडेट दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत, अयानने 'ब्रह्मास्त्र 2' व 'ब्रह्मास्त्र 3' बद्दल सांगितलं आहे.  

कधी येणार ‘ब्रह्मास्त्र 2’ आणि ‘ब्रह्मास्त्र 3’...आता सिनेमाची अपडेट देताना अयानने पोस्ट शेअर केली. तो यात म्हणतो, ''ब्रह्मास्त्र ट्रायोलॉजी व माझ्या लाईफबद्दलची अपडेट देण्याची वेळ आली आहे.  पार्ट 1 ला मिळालेलं प्रेम पाहता मी पार्ट 2 व पार्ट 3 वर लक्ष केंद्रीत केलं आहे. हे दोन्ही भाग पहिल्या भागापेक्षाही मोठे असतील. पहिल्या भागातून आम्ही जे काही शिकलो  त्यानुसार स्क्रिप्ट्सवर आम्ही अधिक लक्ष देत आहोत. आम्ही पुढचे दोन्ही पार्ट एकत्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या रिलीज डेटही आसपासच्या असतील. रिलीजच्या वेळा मी निश्चित केल्यात ज्या तुमच्यासोबत शेअर करत आहे.  'ब्रह्मास्त्र पार्ट 2' डिसेंबर 2026 रोजी आणि 'पार्ट 3' डिसेंबर 2027 रोजी रिलीज केला जाईल.  लवकरच मी सिनेमाच्या दिग्दर्शनाला सुरुवात करणार आहे. परमेश्वरानं मला एक खास सिनेमा दिग्दर्शित करण्याची खूप चांगली संधी दिली आहे. ही माझ्यासाठी केवळ संधी नाही तर एक आव्हान आहे आणि मी त्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. 'ब्रह्मास्त्र'नं मला खूप गोष्टी शिकवल्या..त्यातनं मला उर्जा मिळाली..प्रोत्साहन मिळालं आणि मी हळूहळून पुढे गेलो. आता मी नवीन आव्हानं स्वीकारण्याचा निश्चय केलाय''.

इतकी मोठी प्रतीक्षा...?अयानने ‘ब्रह्मास्त्र 2’ डिसेंबर 2026 आणि ‘ब्रह्मास्त्र 3’ डिसेंबर 2027 मध्ये रिलीज करण्याची घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेनंतर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. काहींनी याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. तर काहींनी या दोन्ही पार्टसाठी 4 ते 5 वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. लवकर रिलीज केला नाही तर सिनेमे नक्कीच आपटणार, असं एका युजरने म्हटलं आहे. आम्ही इतकी मोठी प्रतीक्षा करू शकत नाही, 3 वर्षे कमी करू शकताेस का? असा सवाल एका युजरने केला आहे. चाहत्यांना इतकी प्रतीक्षा कोण करायला लावतं? असा सवाल अन्य एका युजरने केला आहे. 

टॅग्स :ब्रह्मास्त्रबॉलिवूड