Join us

गायक अरिजीत सिंहच्या आईचे कोरोनानं निधन; कोलकात्यात घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 16:18 IST

अरिजीतच्या आईला ‘ए निगेटिव्ह’ रक्ताची आवश्यकता असल्याची पोस्ट अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांनी 6 मे रोजी सोशल मीडियावर लिहिली होती.

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना कोलकत्ता इथल्या AMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते.  कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. रुग्णालयात उपचारादरम्यानही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हते.  गुरुवारी सकाळी 11 वाजताच त्यांचं निधन झालं. 

अरिजीतच्या आईला ‘ए निगेटिव्ह’ रक्ताची आवश्यकता असल्याची पोस्ट अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांनी 6 मे रोजी सोशल मीडियावर लिहिली होती. स्वस्तिकाच्या पोस्टवर कमेंट करुन चाहत्यांनी रक्तदान करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. स्वस्तिका मुखर्जीशिवाय भूमी पेडणेकर, तापसी पन्नू सारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड, औषधे आणि इतर अनेक गोष्टींसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मदतीचं आवाहन केलं होतं.

अरिजीत सिंहने वयाच्या 18 व्या वर्षी आपल्या करिअरला सुरुवात केली. तो ‘फेम गुरुकुल’ या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता.  अरिजीतने फिर ले आया दिल, तुम ही हो, मस्त मगन, मनवा लागे, छन्ना मेरेया यांसारखी अनेक हिट गाणी बॉलिवूडला दिलीत. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’मधील तुम ही हो, चाहू मैं या ना या गाण्यांमुळे तर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. याच गाण्याने अरिजीतला खरी ओळख मिळवून दिली.यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

टॅग्स :अरिजीत सिंह