बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसतात. आता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह म्हटल्यावर ट्रोल होणेही आलेच. सध्या अनुपम खेर असेच ट्रोल होत आहेत. होय, लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांवर त्यांनी एक कविता लिहिली. या कवितेतून त्यांनी स्थलांतरीत मजुरांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला आणि मग काय, अनुपम ट्रोल झालेत. युजर्सने त्यांना हे ढोंग बंद करून थेट सरकारला जाब विचारण्याचा सल्ला दिला.
लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांच्या हाताला काम नाही. अशात हजारो मजूर स्थलांतर करत मिळेत त्या साधनाने वा पायी आपआपल्या गावी निघाले आहेत. हजारो किमीची पायपीट करत घरी निघालेल्या मजूरांचे जत्थेच्या जत्थे रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. अनुपम यांनी याच मजूरांचे दु:ख, वेदना मांडणारा व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी एक कविता वाचून दाखवली. त्यांची ही कविता ऐकली आणि अनेक युजर्स भडकले.
‘या मजूरांसाठी काय केले, असा सवाल सरकारला विचारा ना. निव्वळ ढोंग कशाला?’ असे या युजरने लिहिले. एका युजरने ‘घराबाहेरही पडा की कधी कधी’ अशा शब्दांत अनुपम यांना ट्रोल केले. एकाने अनुपम यांच्या कवितेचा संबंध थेट राजकारणाशी जोडला. ‘सरकारविरोधात काही बोलू नका़ राज्यसभेची जागा धोक्यात येईल,’ असा टोला त्याने लगावला.