Join us  

अन्  ‘तिच्या’ मृत्यूचीच बातमी आली...! अनुपम खेर हळहळले, शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 10:23 AM

तिच्या मृत्यूची बातमी अभिनेते अनुपम खेर यांना कळली आणि त्यांना मोठा धक्का बसला. कारण अलीकडे अनुपम खेर तिच्याशी बोलले होते.

ठळक मुद्देसराहना कश्मीर फाइल्सची लाइन प्रोड्यूसर होती.

‘द कश्मीर फाइल्स’  (The Kashmir Files ) या चित्रपटाची लाइन प्रोड्यूसर सराहना आज या जगात नाही. सराहनाने गेल्या 30 जूनला तिच्या राहत्या घरी आत्महत्या करत आयुष्य संपवले. तिच्या मृत्यूची बातमी अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher ) यांना कळली आणि त्यांना मोठा धक्का बसला. कारण अलीकडे अनुपम खेर सराहनाशी बोलले होते. एक लांबलचक पोस्ट लिहून त्यांनी सराहनाबद्दलच्या भावना व्यक्त करत, तिला श्रद्धांजली वाहिली. शिवाय तिचा एक मॅसेजही शेअर केला. (The line producer of The Kashmir Files  who died by suicide)

अनुपम यांनी लिहिले, ‘ही सराहना आहे.  मी डेहराडून व मसूरीमध्ये शूटींग करत असतानाचा तेव्हा ती  कश्मीर फाइल्सची लाइन प्रोड्यूसर होती. गेल्यावर्षी 22 डिसेंबरला चित्रपटाच्या युनिटने सेटवर तिचा वाढदिवसही साजरा केला होता. लॉकडाऊनमुळे ती तिच्या अलीगड या गावी गेली होती. ती तिच्या कामात एकदम शानदार होती. माझ्या आईच्या वाढदिवसाला सराहनाने एक सुंदर मॅसेजही पाठवला होता. मी तिला फोन केला होता आणि आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या होत्या. पण आज सराहना या जगात नाही, असा मॅसेज मला मिळाला. 30 जूनला तिने आत्महत्या केली. हा मॅसेज वाचून मला जबर धक्का बसला. मॅसेज मिळताच मी सराहनाच्या आईला फोन केला आणि तिच्या मृत्यूची बातमी दुर्दैवाने खरी असल्याचे मला कळले. डिप्रेशनमुळे सराहनाने इतके टोकाचे पाऊल उचलले. डिप्रेशन आजच्या तरूणाईला गिळू पाहत आहे. मी तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. तिची आई आणि भावाला या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो. खूप दु:खद. ओम शांती...’

टॅग्स :अनुपम खेर