Join us  

बॉलिवूडला आणखी एक झटका, प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 12:14 PM

छोटी सी बात, रजनीगंधा आणि चमेली की शादी या चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे मुंबईत निधन झाले.

२०२० हे वर्ष बॉलिवूडसाठी सर्वात वाईट असल्याचे सिद्ध होत आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे त्रस्त आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडमधून एकामागून एक वाईट बातम्या येत आहेत. इरफान खान, ऋषी कपूर,  वाजिद खान आणि गीतकार अनवर सागर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना गमावल्यानंतर बॉलिवूडला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन मुंबईत निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.  अशोक पंडित यांनी बासू चॅटर्जी यांच्या निधनाची माहिती ट्विटरवर दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, मला सांगताना अत्यंत खेद होत आहे की महान दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार दुपारी 2वाजता सांताक्रुझ स्मशानभूमीत होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीची खूप मोठी हानी झाली आहे. आम्हाला तुमची आठवण येईल सर.

१० जानेवारी १९३० रोजी बासू चटर्जी यांचा जन्म झाला. सहायक दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या बासू चटर्जी यांनी दिग्दर्शक म्हणून रजनीगंधा, चितचोर, छोटीसी बात, खट्टामीठा, बातों-बातों में यांसारखे सुंदर चित्रपट दिले.

चित्रपटांत विविधता देणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटाची गती वाढवली. त्यांचे एकाच वर्षात दोन चित्रपट येणे सुरू झाले. बासूदा आपल्या चित्रपटांतून मध्यमवर्गाची छोटीसी बात सांगत. मुंबईतील बस स्टॉपपासून चाळीपर्यंत त्यांचे ‘पिया का घर’ अगदी ‘खट्टा मिठ्ठा’ खुले.

पन्नासहून अधिक हिंदी व बंगाली चित्रपटांसह त्यांनी रजनी, व्योमकेश बक्षी या मालिकांचे दिग्दर्शन केले. हृषीकेश मुखर्जी आणि बासू चॅटर्जी यांच्या त्या काळी असलेल्या निकोप स्पर्धेमुळे खरोखर मनाला विरंगुळा देणारे चित्रपट निर्माण झाले.

बी. आर. चोप्रा यांनी ‘छोटीसी बात’च्या वेळी बासू चटर्जींना तसेच स्वातंत्र्य दिल्याने निखळ मनोरंजन करणाऱ्या मध्यमवर्गीय चित्रपटांचा प्रवाह सुरू झाला. राजेंद्र यादव यांच्या ‘सारा आकाश’ कादंबरीवर बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा मृणाल सेन यांच्या ‘भुवनशोम’च्या बरोबरीने समांतर धारेतला पहिला चित्रपट ठरला.

बासू चटर्जी यांची कन्या रूपाली गुहा यांनी आपल्या वडिलांची परंपरा पुढे सुरू ठेवत मराठी सिनेनिर्मितीत पाऊल टाकले आहे. त्यांचे पती कल्याण गुहा हे हिंदीतील मानवंत निर्माते दुलार गुहा यांचे पुत्र असून, गुहा दाम्पत्याच्या निर्मितीखाली ‘नारबाची वाडी’ हा पहिला वहिला मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांची सेकंड जनरेशन मराठी सिनेमाकडे वळली आहे असे म्हणता येईल.

टॅग्स :बॉलिवूड