Join us  

अनिल कपूरने भाजपाला दिल्या विजयाच्या शुभेच्छा... या कारणामुळे त्याने केले नव्हते मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 7:53 PM

अनिलने मतदान का केले नाही याची चांगलीच चर्चा रंगली होती. पण आता या गोष्टीविषयी त्याने स्वतःच मीडियाला सांगितले आहे.

ठळक मुद्देअनिल कपूर त्याच्या काही उपचारांसाठी बाहेर देशात असल्याने त्याला मतदान करता आले नाही असे त्याने स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून भारतीय जनता पार्टीला चांगलेच यश मिळाले आहे. या निवडणूकीला अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी वेळात वेळ काढून मतदान केले होते. पण या सगळ्या सेलिब्रेटींमध्ये आपल्याला अनिल कपूर कुठेच दिसला नव्हता. अनिलने मतदान का केले नाही याची चांगलीच चर्चा रंगली होती. पण आता या गोष्टीविषयी त्याने स्वतःच मीडियाला सांगितले आहे.

अनिल कपूर त्याच्या काही उपचारांसाठी बाहेर देशात असल्याने त्याला मतदान करता आले नाही असे त्याने स्पष्ट केले आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी यावेळी मतदान केले... पण तू मतदान का केले नाहीस हा प्रश्न त्याला एका इव्हेंटच्या दरम्यान विचारला असता त्याने सांगितले. मतदानाच्या दिवशी मी उपचारासाठी म्युनिख येथे गेलो होतो. मी ही अपॉईंटमेंट जवळजवळ दीड वर्षांपूर्वी घेतली होती. त्यामुळे मला त्यात बदल करणे शक्य नव्हते. माझी पत्नी सुनिता देखील माझ्या सोबतच होती. पण मतदान करायला न मिळाल्याचे मला प्रचंड वाईट वाटले. मी जर्मनीत असताना तेथील एम्बेसी मध्ये जाऊन मतदान करू शकतो का याची चौकशी केली होती. पण अशी काहीही सुविधा नसल्याचे त्यांनी मला सांगितले. पण माझ्यामते भविष्यात भारताच्या बाहेर असणाऱ्या लोकांना देखील मतदान करण्याची काहीतरी सोय असली पाहिजे. 

लोकसभा निवडणुकीआधी अनेक सेलिब्रेटींनी ट्वीट करत प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असा संदेश त्यांच्या चाहत्यांना दिला होता. त्यावेळी अनिल कपूरने देखील ट्वीट करत मतदानाविषयी जागृती निर्माण केली होती. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, आपल्या एका मताने गोष्टी बदलू शकतात. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की, आपला भारत अधिक सक्षम बनवण्यासाठी तुम्ही मतदान नक्कीच करा...

अनिलने हे ट्वीट करून देखील त्यानेच मतदान केले नव्हते. त्यामुळे अनिलने मतदान का केले नाही असा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. आता त्यानेच ही गोष्ट स्पष्ट केली आहे. 

भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशानंतर अनिलने ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

टॅग्स :अनिल कपूरलोकसभालोकसभा निवडणूक २०१९लोकसभा निवडणूक निकाल