Join us  

हेमा मालिनी यांचे धर्मेंद्र नव्हे तर या अभिनेत्यासोबत होणार होते लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 8:27 PM

गिरीश कर्नाड आणि हेमा मालिनी यांचे लग्न व्हावे अशी हेमा मालिनी यांच्या आईची इच्छा होती.

ठळक मुद्देहेमामालिनी यांच्या आईने गिरीश कर्नाड यांच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव देखील ठेवला होता. गिरीश आपल्या मुलीसाठी योग्य आहेत असे हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्ती यांचे म्हणणे होते. या लग्नाच्या प्रस्तावाविषयी गिरीश कर्नाड यांनीच सांगितले होते. 

कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचे काल निधन झाले. प्रदीर्घ आजाराने वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बंगळुरूतील निवासस्थानी गिरीश कर्नाड यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. 'उंबरठा' या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. 

 

गिरीश कर्नाड यांचा जन्म 19 मे 1938 रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. कर्नाड यांचे मूळगाव कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कार्नाड’ हे आहे. वडील रघुनाथ कर्नाड हे नावाजलेले डॉक्टर होते. गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बीए उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले होते.

तुम्हाला माहीत आहे का, गिरीश कर्नाड आणि हेमा मालिनी यांचे लग्न व्हावे अशी हेमा मालिनी यांच्या आईची इच्छा होती. सत्तरच्या दशकात सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये हेमा मालिनी यांची गणना केली जात असे. संजीव कुमार, धर्मेंद्र यांसारखे अभिनेते त्यांच्या सौंदर्यावर फिदा झाले होते. पण हेमा मालिनी यांनी या अभिनेत्यांसोबत लग्न न करता गिरीश कर्नाड यांच्यासोबत लग्न करावे असे हेमा मालिनी यांच्या आईला वाटत होते. हेमामालिनी यांच्या आईने गिरीश कर्नाड यांच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव देखील ठेवला होता. गिरीश आपल्या मुलीसाठी योग्य आहेत असे हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्ती यांचे म्हणणे होते. या लग्नाच्या प्रस्तावाविषयी गिरीश कर्नाड यांनीच सांगितले होते. 

गिरीश आणि हेमा यांचे लग्न व्हावे असे हेमा यांच्या आईला वाटत असले तरी हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या होत्या. काहीही करून धर्मेंद्र यांच्यासोबतच लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते. या घटनेनंतर काहीच वर्षांत धर्मेंद्र आणि हेमा यांनी लग्न केले. धर्मेंद्र यांचे हे दुसरे लग्न होते. प्रकाश कौर यांच्यासोबत धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झाले होते आणि त्यांना मुलं देखील होती.

टॅग्स :गिरिश कर्नाडहेमा मालिनीधमेंद्र