Join us

​- तर नाईट क्लबमध्येही ड्रिंकिंगआधी राष्ट्रगीत वाजवायला हवे...रामगोपाल वर्मांचे वादग्रस्त विधान...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 17:41 IST

राम गोपाल वर्मा म्हणजे एक वेगळं रसायन. रामगोपाल वर्मा कायम इतरांपेक्षा वेगळा विचार करतात. इतरांपेक्षा वेगळा दृष्टिकोन बाळगणारे रामगोपाल ...

राम गोपाल वर्मा म्हणजे एक वेगळं रसायन. रामगोपाल वर्मा कायम इतरांपेक्षा वेगळा विचार करतात. इतरांपेक्षा वेगळा दृष्टिकोन बाळगणारे रामगोपाल वर्मा यामुळे अनेकदा अडचणीत आले. अनेकदा त्यांनी स्वत:हून वाद ओढवून घेतलेत. आता असेच एक वाद ओढवून घेणारे विधान त्यांनी केले आहे. सिनेमागृहात चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावर त्यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य झाले तर मग नाईट क्लबमध्येही ड्रिंकिंगआधी राष्ट्रगीत वाजवायला हवे, इतपर्यंत धाडसी विधान त्यांनी केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयाद्वारे देशभरातील चित्रपटगृहांमध्ये तिरंग्यासह राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य केले आहे. शिवाय यासोबत काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. त्याचे पालन करणे सिनेमागृहांच्या मालकांची जबाबदारी असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचे अनेकांनी स्वागत केले असले तरी रामगोपाल वर्मा मात्र या निर्णयावर चांगलेच भडकले आहेत. twitterवर या निर्णयाबद्दल त्यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आदर हा मनात असायला हवा. तो थोपवला जात असेल तर बनावटी होतो. राष्ट्रगीताचा यापेक्षा मोठा अपमान असूच शक्त नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक परखड सवाल केले आहेत. राष्ट्रगीत चित्रपटगृहांपर्यंतच मर्यादीत का असावे? प्रत्येक दुकानदाराने त्याच्या ग्राहकांना दुकानात प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रगीताचा व्हिडिओ दाखवणे अनिवार्य का असू नये? टीव्ही आणि रेडिओ प्रोग्राम सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत का वाजवले जाऊ नये? नाईट क्लबमध्ये ड्रिंकिंग आणि डान्सिंगपूर्वी राष्ट्रगीत का अनिवार्य असू नये? असे अनेक सवाल त्यांनी केले आहेत.इतकेच नाही तर राष्ट्रगीताबद्दल एखादी परिक्षा घेतली तर ९९ टक्के भारतीय फेल होतील, असेही त्यांनी म्हटले आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. नोटबंदीची घोषणा करण्यापूर्वी पंतप्रधानांनी सुद्धा राष्ट्रगीत गायला हवे होते, असे त्यांनी म्हटले आहे.