Join us  

अमरिश पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डुडलने दिली त्यांना मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 11:35 AM

अमरिश पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डुडलने त्यांना मानवंदना दिली आहे.

ठळक मुद्देगुगल डुडलवर आपल्याला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेमधील त्यांच्या लूकचा स्केच पाहायला मिळत आहे. हे डुडल पुण्यातील देबांग्शू मौलिक यांनी बनवले असून हे डुडल लोकांना प्रचंड आवडत आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी आज आपल्यात नाहीत. पण सिनेप्रेमींच्या मनात ते सदैव जिवंत असतील. आज म्हणजेच २२ जूनला अमरीश पुरी यांचा वाढदिवस आहे. २२ जून १९३२ रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या अमरीश पुरी यांनी ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. खरे तर  इतर अभिनेत्यांप्रमाणे तेही हिरो बनण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. पण निर्मात्यांनी त्यांचा चेहरा पाहून त्यांना हिरोची भूमिका नाकारली होती.

अमरिश पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डुडलने त्यांना मानवंदना दिली आहे. गुगल डुडलवर आपल्याला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेमधील त्यांच्या लूकचा स्केच पाहायला मिळत आहे. हे डुडल पुण्यातील देबांग्शू मौलिक यांनी बनवले असून हे डुडल लोकांना प्रचंड आवडत आहे.

अमरीश पुरी यांचे मोठे भाऊ मदन पुरी आधीपासूनच चित्रपट इंडस्ट्रीमध्ये होते. मोठ्या भावाप्रमाणे इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अमरीश पुरी मुंबईत दाखल आले. पण पहिल्याच स्क्रिन टेस्टमध्ये ते अपयशी ठरले. तुझा चेहरा हिरोसारखा नाही, असे म्हणून निर्मात्यांनी अमरीश पुरी यांना परत पाठवले होते. यानंतर अमरीश यांनी विमा विभागात नोकरी करायला सुरुवात केली. पण तरीही अभिनयाचा किडा त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. त्यांनी पृथ्वी थिएटरमधील नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांना पहिला चित्रपट मिळाला. पुढे खलनायक म्हणून त्यांनी स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यातही त्यांनी हिंदी प्रमाणेच मराठी, कन्नड, पंजाबी, तेलगू, तामीळ, इंग्रजी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. 

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील बलदेव सिंग, करण अर्जुन मधील दुर्जन सिंग, गदर एक प्रेम कथा मधील अशरफ अली, मिस्टर इंडिया या चित्रपटातील मॉगॅम्बो, नायक चित्रपटातील मुख्यमंत्री यांसारख्या त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 

अमरिश पुरी यांचे निधन १२ जानेवारी २००५ ला वयाच्या ७२ व्या वर्षी झाले. 

 

टॅग्स :अमरिश पुरीगुगल