Join us  

Birthday Special : चित्रपटांत येण्यापूर्वी बँकेत क्लर्क होते अमोल पालेकर, गर्लफ्रेन्डमुळे बनले अ‍ॅक्टर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 8:00 AM

सामान्य माणसाच्या भूमिका साकारून अजरामर झालेले अभिनेते अमोल पालेकर यांचा आज वाढदिवस

ठळक मुद्दे30 वर्षांच्या सुखी संसारानंतर अमोल व चित्रा यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सामान्य माणसाच्या भूमिका साकारून अजरामर झालेले अभिनेते अमोल पालेकर यांचा आज वाढदिवस. 1970 च्या दशकात ‘लार्जद दॅन लाईफ’ भूमिका साकारण्याकडे अनेक स्टार्सचा ओढा असताना अमोल पालेकरांनी मात्र पडद्यावर सामान्य माणसाच्या भूमिका स्वीकारल्या. केवळ साकारल्या नाहीत तर या भूमिकांना एक वेगळे वलय प्राप्त करून दिले. त्यामुळेच आजही अमोल पालेकर म्हटले की, पे्रक्षकांच्या डोळ्यासमोर त्यांच्या त्याच भूमिका येतात. 

अमोल पालेकर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता म्हणून ओळखले जातात. पण वाचून आश्चर्य वाटेल की, अमोल पालेकर यांना कधीच अभिनेता बनायचे नव्हते. पेंटिग, चित्रकला हे त्यांचे पहिले प्रेम होते. होय, अमोल पालेकर यांना अभिनेता नाही चित्रकार बनायचे होते. ‘मी प्रशिक्षण घेऊन चित्रकार झालो, अपघाताने अभिनेता बनलो, अगतिकपोटी निर्माता बनलो आणि आवडीने दिग्दर्शक झालो,’ असे अमोल पालेकर नेहमी म्हणतात, ते त्याचमुळे.

 चित्रपटाशी अमोल पालेकर यांचा वा त्यांच्या कुटुंबाचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. त्यांचे वडिल पोस्टात नोकरीला होते तर आई एका खासगी कंपनीत नोकरी करायची. पदवीनंतर अमोल पालेकर यांनी बँक आॅफ इंडियामध्ये आठ वर्षे नोकरी धरली. मग ते सिनेमात कसे आलेत? तर यामागे एक अत्यंत रोचक स्टोरी आहे.

होय, अमोल पालेकर आपल्या गर्लफ्रेन्डमुळे अभिनेता बनले. तिचे नाव चित्रा. चित्रा ही एक थिएटर आर्टिस्ट होती. अमोल यांच्या लहान बहीणीची वर्गमैत्रिण असल्याने अमोल व चित्रा यांच्या भेटीगाठी होत. यातून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. अमोल चित्रांसोबत थिएटरमध्ये जात. अनेकदा थिएटरबाहेर चित्रा यांची वाट बघत उभे राहत. एकदा सत्यदेव दुबे यांची नजर अमोल पालेकर यांच्यावर पडली आणि त्यांनी  अमोल यांना नाटकात काम करण्यासाठी प्रेरित केले. काही दिवसानंतर दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांनी एका चित्रपटासाठी अमोल पालेकर यांच्याशी संपर्क साधला. पण अमोल यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. अर्थात बासू चॅटर्जी यांनी याऊपरही अमोल पालेकर यांचा पिच्छा पुरवला. पुढच्या चित्रपटासाठी ते पुन्हा एकदा अमोल यांच्याकडे पोहोचले. अखेर अमोल यांनी होकार दिला. मग काय या पहिल्या चित्रपटानंतर अमोल पालेकर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलेच. सोबत दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही वेगळी ओळख निर्माण केली.

अमोल यांनी 1969 मध्ये चित्रा यांच्यासोबत लग्न केले. या दोघांना शाल्मली नावाची मुलगी झाली.  

30 वर्षांच्या सुखी संसारानंतर अमोल व चित्रा यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे अमोल यांनी संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले.

टॅग्स :अमोल पालेकर