Amitabh Bachchan Angry At Paps: दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत असतात. 'अंग्री यंग मॅन' म्हणून प्रसिद्ध असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात ते सौम्य, नम्र आणि शांत स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांचा रागावलेला अवतार पाहणे ही फारच दुर्मिळ गोष्ट आहे. पण, अशातच अमिताभ यांना कॅमेऱ्यासमोरच राग अनावर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ त्यांच्या मुंबईतील 'जलसा' या निवासस्थानाबाहेरचा आहे. या ठिकाणी अमिताभ बच्चन बंगल्याबाहेर आले होते. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केलेला होता. त्यावर त्यांनी शॉल घेतलेली दिसली. मात्र, यावेळी एका पापाराझीने त्यांची परवानगी न घेता सरळ कॅमेरा चालू केला. यावर अमिताभ बच्चन चिडले आणि मोठ्या स्वरात त्या पापाराझीला "अरे, व्हिडीओ घेऊ नकोस, थांबव" असं म्हटलं.
बिग बींचा हा अवतार पाहून पापाराझीनं लगेच व्हिडीओ बंद केला. पण, जेवढं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं, ते मात्र व्हायरल झालंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर दोन प्रकारचे मतप्रवाह दिसून आलेत. काहींनी पापाराझींनी मर्यादा ओलांडल्याचं म्हणत बिग बींचं समर्थन केलं. तर काहींनी असा संताप व्यक्त करणे योग्य नव्हतं, असं मत मांडलं.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या 'Kalki 2898 AD' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. याशिवाय 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय शोचा पुढील १७ वा सीझन ते घेऊन येत आहे.