Join us  

खूप काही बघितलं, हेच बघायचं राहिलं होतं...! अमिताभ बच्चन यांची पोस्ट का? कशासाठी?  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 10:09 AM

51 वर्षांचा प्रवास. या प्रवासात मी अनेक बदल पाहिलेत...!!

ठळक मुद्दे  ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात अमिताभ आणि आयुष्यमान यांची मजेदार जोडी आहे.

लॉकडाऊनमध्ये जगात अनेक गोष्टी पहिल्यांदा घडताहेत. होय, कधी नव्हे तर जग थांबलेय. डोळ्याला न दिसणा-या एका व्हायरसने जगाला बदलायला भाग पाडले आहे. या बदलाने अनेकांना हैराण केले आहे. महानायक अमिताभ हेही त्यापैकीच एक. 51 वर्षांत हेच बघायचे राहिले होते, असे त्यांनी म्हटले आहे. याला पार्श्वभूमी आहे, अमिताभ व आयुष्यमान खुराणा यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा आगामी सिनेमा.अमिताभ व आयुषमान यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा येत्या 12 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण चित्रपटगृहांमध्ये नाही तर ऑनलाईन. होय, कोरोना व्हायरस, लॉकडाऊन यामुळे हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाची रिलीज डेट जाहिर होताच़ अमिताभ यांनी सोशल मीडियावर वरील प्रतिक्रिया दिली.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘मी 1969 साली फिल्म इंडस्ट्रीत आलो. आता 2020 सुरु आहे. म्हणजे, 51 वर्षांचा प्रवास. या प्रवासात मी अनेक बदल पाहिलेत. अनेक आव्हाने झेलली. आता एक नवे आव्हान झेलण्यास मी सिद्ध आहे. माझ्या चित्रपटाचे डिजिटल रिलीज. ‘गुलाबो सिताबो’ 12 जूनला अ‍ॅमेझॉन प्राईमवर. अख्ख्या जगात, 200 देशांमध्ये एकाचवेळी माझा सिनेमा रिलीज होईल. हे मजेशीर आहेच. आणखी एका आव्हानाचा भाग होता आले, याचा मला अभिमान आहे.’

‘गुलाबो सिताबो’ या सिनेमाची घोषणा गेल्यावर्षी मे महिन्यात करण्यात आली होती. शूजित सरकार दिग्दर्शित हा सिनेमा गेल्या महिन्यात 17 एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार होता. मात्र त्यापूर्वीच मार्चमध्ये कोरोनाने हाहाकार माजला. पाठोपाठ लॉकडाऊन घोषित करण्यात आले. चित्रपटगृह बंद असल्याने ‘गुलाबो सिताबो’चे रिलीज थांबले. परिस्थिती निवळण्याची प्रतीक्षा मेकर्सनी केली. पण तूर्तास तरी  स्थिती कधी पूर्वपदावर येईल आणि आलीच तर चित्रपटगृहांकडे प्रेक्षक फिरकतील की नाही, या चिंतेने बॉलिवूडकरांना ग्रासले आहे. अशात अनेक चित्रपट चित्रपटगृहांऐवजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला जात आहे. ‘गुलाबो सिताबो’ ही त्याचाच एक भाग आहे.  ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात अमिताभ आणि आयुष्यमान यांची मजेदार जोडी आहे. अमिताभ बच्चन घरमालक आहेत, तर आयुष्यमान घराचा भाडेकरू. एक भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील लढाईची मजेशीर अशी ही कथा आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनआयुषमान खुराणा