Join us  

अमिषा पटेलचे इंस्टाग्राम अकाउंट झाले हॅक, नेदरलँडहून आलेल्या एका मेसेजमुळे झाली गडबड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 1:58 PM

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हॅकिंगचे प्रकरणं खूप समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध सेलिब्रेटींचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते. त्यानंतर लगेच इंस्टा सपोर्ट टीमच्या मदतीने त्यांचे अकाउंट रिकव्हर झाले. आता या यादीत अभिनेत्री अमिषा पटेलच्या नावाचा समावेश झाला आहे.  तिचे देखील इंस्टाग्राम अकाउंट नुकतेच हॅक झाले आहे. त्यानंतर तिने याची तक्रार महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलमध्ये केली आहे. त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई केली आणि अभिनेत्रीचे अकाउंट रिकव्हर केले. ही संपूर्ण माहिती सायबर सेलच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमिषा पटेलने सायबर सेलला सांगितले की कॉपीराइट संदर्भात इंस्टाग्रामवर तिला एक मेसेज आला आहे. यात एक लिंक आली होती जी क्लिक करताच अमिषा फेक साइटवर पोहचली आणि तिचे अकाउंट हॅक झाले. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीने ४ जानेवारीला पोलिसांकडे याची तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी कारवाई करत इंस्टाग्रामला संपर्क करत तिचे अकाउंट रिकव्हर केले. 

तपासात समजले की, ही लिंक नेदरलँडहून पाठवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी इतर लोकांना देखील अलर्ट करत सांगितले की, आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करा. 

गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच प्रसिद्ध सेलिब्रेटींचे इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाउंट्स हॅक झाले आहेत. यात हृतिक रोशनची एक्स वाइफ सुजैन खान, गायिका अंकित तिवारी, गायिका आशा भोसले, कोरियोग्राफर फराह खान आणि अभिनेता विक्रांत मैसीच्या नावाचा समावेश आहे.

टॅग्स :अमिषा पटेलइन्स्टाग्राम