Join us  

Hathras Gangrape Case : हाथरस घटनेवरून संतापली आलिया भट्ट, म्हणाली - 'तुम्ही तिची जीभ कापली असेल, पण...'

By अमित इंगोले | Published: October 01, 2020 4:07 PM

अक्षय कुमारपासून ते प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मासारखे सेलिब्रिटी यावर बोलले. आता अभिनेत्री आलिया भट्ट या घटनेची निंदा केलीये.

हाथरसमध्ये एका १९ वर्षाच्या मुलीवर झालेल्या गॅंगरेपच्या घटनेने पुन्हा एकदा देशाला हादरवून सोडलं आहे. सोशल मीडियातून लोक आपला संताप व्यक्त करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही या घटनेवर संताप व्यक्त केलाय. अक्षय कुमारपासून ते प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मासारखे सेलिब्रिटी या घटनेवर सोशल मीडियातून बोलले. आता अभिनेत्री आलिया भट्ट या घटनेची निंदा केलीये.

आलिया भट्टने गॅंगरेप पीडितेसाठी न्यायाची मागणी करत आवाज उठवला आहे. आलियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर या घटनेविरोधात आपला राग व्यक्त केलाय. आलियाने लिहिले की, 'त्यांनी तिची जीभ कापली, पण ते तिला गप्प करू शकले नाहीत. आज ती अब्जो लोकांचा आवाज बनून बोलत आहे'. यासोबतच तिने #Hathras वापरलाय.

प्रियांका चोप्रानेही या घटनेवर नाराजी व्यक्त केलीय. तिने पोस्ट करून प्रश्न विचारला की, आणखी किती निर्भया होतील आणि किती वर्षे लागतील?

(Image Credit : hindustantimes.com)

याआधी अभिनेता अक्षय कुमार ते कंगना रणौत, स्वरा भास्कर यांनीही या घटनेवरून पोस्ट लिहिल्या आहेत. अक्षय कुमारने लिहिले होते की, 'हाथरसमध्ये झालेल्या क्रूर घटनेमुळे रागात आणि परेशान आहे. आपले कायदे इतके कठोर झाले पाहिजे की, शिक्षेबाबत विचार करूनच बलात्काऱ्यांचा थरकाप उडेल. या आरोपींना फासावर लटकवले पाहिजे'.

आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाखांचे बक्षीस, विश्व हिंदू सेनेची घोषणा

एका तरुणीवर अमानूष पद्धतीने बलात्कार करणाऱ्या चार आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक यांनी केली आहे. विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अरुण पाठक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नेपाळमधील एका तरुणाचे मुंडण केले होते. त्यानंतर वाराणसी पोलिसांनी अरुण पाठक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच विश्व हिंदू सेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली होती. मात्र अरुण पाठक हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार

हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :आलिया भटप्रियंका चोप्राहाथरस सामूहिक बलात्कारबॉलिवूड