Join us  

Akshay Kumar: अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध, कोर्टात गेले प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 5:09 PM

चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा ठपका ठेवत करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लरचा (Manushi Chillar)  आगामी 'पृथ्वीराज' (Prithviraj) सिनेमा वादात अडकला आहे. चित्रपटाचे चाहते प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्यासाठी एक याचिका दाखल केली होती, ज्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे.

पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला

पृथ्वीराज या चित्रपटाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्र सरकारला विचारले की, पृथ्वीराज चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले आहे का? करणी सेनेच्या उपाध्यक्षा संगीता सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती एआर मसूदी आणि न्यायमूर्ती एनके जोहरी यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

या चित्रपटावर बंदी घालण्याची करणी सेनेची मागणी आहे. चित्रपटात पृथ्वीराज यांची चुकीची प्रतिमा दाखवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या चित्रपटामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील, अले असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच, चित्रपटाच्या प्रिव्ह्यूवरुन हा चित्रपट वादग्रस्त असल्याचे मत करणी सेनेने म्हटले आहे.

करणी सेनेच्या निशाण्यावर बॉलिवूड

करणी सेना अशा प्रकारच्या ऐतिहासिक चित्रपटाचा विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही करणी सेनेकडून अनेक चित्रपटांना विरोध झाला आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर 'पद्मावत' या चित्रपटाचाही करणी सेनेने जोरदार विरोध केला होता. 

चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले दिग्दर्शन

'पृथ्वीराज' चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. यशराज बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 21 जानेवारीला रिलीज होणार होता, पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे तो होऊ शकला नाही, तो कधी रिलीज होणार हे सध्या तरी ठरलेले नाही. 

टॅग्स :अक्षय कुमारपृथ्‍वीराजकरणी सेना