Join us  

सुशांतच्या आत्महत्येनंतर दिशालाही दु:ख अनावर, एकाच इमोजीतून दिली रिएक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 8:22 AM

एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील भूमिकेमुळे सुशांतला वेगळीच ओळख मिळाली, सुशांतच्या करिअरला मोठा ब्रेक या चित्रपटामुळे मिळाला

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली. बॉलिवूडमधील दिग्गजांनी सुशांतच्या आत्महत्येवर दु:ख व्यक्त करत, हा धक्का असल्याचं म्हटलंय. तर, महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित एमएस धोनी अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून सुशांतने अनेक दिग्गज क्रिकेटर्संच्या मनावर अधिराज्य गाजवल्यामुळे, क्रीडाविश्वामध्येही दु:खाची लाट पसरली. कोणत्याही खेळाडूला सुशांतच्या अशा अचानक जाण्याच्या वृत्तावर विश्वास बसत नाहीए. एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटातील धोनीची पहिली गर्लफ्रेंड आणि खऱ्या आयुष्यातील चांगली फ्रेंड असलेल्या दिशा पटानीनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील भूमिकेमुळे सुशांतला वेगळीच ओळख मिळाली, सुशांतच्या करिअरला मोठा ब्रेक या चित्रपटामुळे मिळाला. या चित्रपटातील त्याने केलेलं काम अन् भूमिका अजरामर ठरली आहे. चित्रपटात माहीच्या पहिल्या प्रेयसीची म्हणजेच प्रियंका झा या पात्राची भूमिका दिशाने बजावली होती. आपल्या छोट्याश्या भूमिकेतूनही दिशा अन् माहीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. प्रियंका अन् माहीची छोटीसी लव्हस्टोरी अनेकांनी भावली अन् तितकच दु:खही देऊन गेली. सुशांत सिंहची प्रेयसी बनलेल्या दिशाने सुशांतच्या मृत्युनंतर एका इमोजीत आपलं दु:ख व्यक्त केलंय. दिशाने लव्ह ब्रेकचा म्हणजे प्रेम तुटल्याचा इमोजी शेअर केला आहे. दिशाने एक शब्दही न लिहता इमोजीतून सर्वकाही सांगितलंय. दिशाच्या या ट्विटवर हजारो कमेंट आल्या असून लाखापेक्षा जास्त लाईक्स आहेत.    

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनं क्रीडा विश्वालाही मोठा धक्का बसला असून भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने ट्विट केले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्तेचे वृत्त कळताच धक्का बसला. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. त्याचा परिवार आणि मित्रांना या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी शक्ती मिळो.’ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याने मी स्तब्ध आणि दु:खी आहे. तो खूप युवा व अत्यंत गुणवान अभिनेता होता. त्याच्या परिवार, मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुशांतचे छायाचित्र पोस्ट करताना म्हटले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या अशा जाण्याने मी स्तब्ध झालो आहे. असे जीवन, ज्यामध्ये अनेक संभावना आहेत आणि अशा प्रकारे निघून जाणे अनपेक्षित. त्याच्या परिवार व प्रशंसकांच्या दु:खात मी सहभागी आहे.’ माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ट्विट केले की, ‘मानसिक स्वास्थ्य गंभीर मुद्दा असून सध्या या मुद्द्यावर जितके लक्ष दिले जाते, त्याहून अधिक लक्ष देण्याची गरज आहे. संवेदनशीलता, सौम्य, दयाळू होणे व जे अडचणीत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणे खूप महत्त्वपूर्ण आहे.’ त्याचप्रमाणे, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग, इरफान पठाण, माजी नेमबाज राज्यवर्धन राठोड, टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल. क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती यांनीही सोशल मीडियाद्वारे सुशांतला श्रद्धांजली वाहिली.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतमहेंद्रसिंग धोनीदिशा पाटनीट्विटर