Join us  

दीड महिन्यानंतर आलिया भट्टने अनुष्का शर्माला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा; पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 4:08 PM

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहलीसोबत विवाहबंधनात अडकलेल्या अनुष्काला आलिया भट्टने चक्क दीड महिन्यानंतर लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहली याच्यासोबत दीड महिन्यापूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाली. अगोदर इटली येथे लग्न, त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले. त्यांच्या लग्नाचा थाट असा होता की, त्याची भनक जगभरातील या दोघांच्या चाहत्यांना लागली असेल. मात्र अभिनेत्री आलिया भट्ट त्यास अपवाद आहे. कारण आलियाने तब्बल दीड महिन्यानंतर अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्याचे समोर आले आहे. सध्या याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून, आलियाची युजर्सकडून चांगलीच खिल्ली उडविली जात आहे. त्याचे झाले असे की, आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नुकत्याच एकत्र आल्या होत्या. यानिमित्त दोघींनी एकत्र स्टेज शेअर केले. याच स्टेजवरून आलियाने अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आलियाने माइकचा ताबा घेताना म्हटले की, मी ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातील एक गाणं सादर करणार आहे. तत्पूर्वी मी अनुष्काला तिच्या लग्नाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. मी तुझ्या लग्नाच्या रिसेप्शनला येऊ शकली नाही, कारण त्यावेळी मी प्रवासात होते. आता मी तुझ्यासाठी एक गाणं गाणार असून, तेच माझ्याकडून तुझ्या लग्नाचे गिफ्ट असेल, असे सांगत आलियाने गाण्यास सुरुवात केली.  या कार्यक्रमात अनुष्का आणि आलियाने अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेला गाउन परिधान केला होता. यावेळी दोघींनी स्टेजवर उपस्थितांबरोबर गप्पा मारत त्यांचे लक्ष वेधून घेतले. आलिया सध्या रणवीर सिंगसोबत ‘गली बॉय’मध्ये काम करीत आहे, तर अनुष्का शर्मा शाहरुख खानच्या ‘झिरो’मध्ये काम करीत आहे. त्याचबरोबर ती वरुण धवनच्या ‘सुई धागा’चीही शूटिंग करीत आहे.