Join us  

तब्बल ३१ वर्षांनंतर गुलजार यांचा हा चित्रपट होणार प्रदर्शित, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 6:45 PM

गुलजार यांच्या लघुपटावर बनलेला चित्रपट तब्बल ३१ वर्षांनी प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट आहेत जे काही कारणास्तव मध्येच अडकले आणि प्रदर्शितही झाले नाहीत. अशाच एक सिनेमा आहे प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक गुलजार यांचा. या चित्रपटाचं नाव आहे लिबास. १९८८ साली बनलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. मात्र आता अशी माहिती मिळतेय की ३१ वर्षांपासून अडकलेला गुलजार यांचा चित्रपट लिबास प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, गुलजार यांचा लिबास चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. झी क्लासिकने या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अधिकृत जाहीर केलं आहे. या निमित्ताने निर्माते विकास मोहन यांचा मुलगा अमूल विकास मोहन यांनी आनंद व्यक्त केला आहे. अमूल यांनी सांगितलं की, मी खूप नशीबवान आहे की मी या प्रोजेक्टचा एक भाग आहे. १९८८ साली हा चित्रपट काही कारणास्तव प्रदर्शित झाला नाही. मात्र माझ्या वडिलांचं स्वप्न आता सत्यात उतरत आहे. यावर्षाखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होईल. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. 

आता लिबास चित्रपट प्रदर्शित कधी होतो आणि या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. लिबास चित्रपटाची कथा गुलजार यांचा लघुपटावर आधारीत आहे. कथेबद्दल सांगायचं तर दिग्दर्शक सुधीरची भूमिका नसीरुद्दीन शाह साकारत आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत शबाना आझ्मी आहेत. या दोघांसह राज बब्बर, सुषमा सेठ, उत्पल दत्त, सविता बजाज व अन्नू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाला संगीत आर. डी. बर्मन यांनी दिलं आहे. या चित्रपटाचं निर्माते विकास मोहन आहेत.

गुलजार यांचा लिबास चित्रपट २०१४ साली गोव्यात पार पडलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये दाखवण्यात आली होती. तसेच १९९२ साली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल बंगळुरूमध्येदेखील दाखवली गेली होती.

टॅग्स :गुलजारनसिरुद्दीन शाहशबाना आझमी