Join us  

१० वर्षानंतर रेणुका शहाणे करणार पुन्हा दिग्दर्शन

By अजय परचुरे | Published: June 10, 2019 11:37 AM

2009 मध्ये आलेल्या रीटा या सिनेमाचं दिग्दर्शन रेणुका शहाणे यांनी केलं होतं.

ठळक मुद्देशबाना आझमी,काजोल आणि मिथिला पालकर या पहिल्यांदाच  सिनेमात एकत्र काम करणार आहेत.

१० वर्षानंतर रेणुका शहाणे करणार पुन्हा दिग्दर्शन आपल्या मधुर हास्याने,वाणीने आणि अभिनयाने बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत प्रसिध्द असणारी अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. रेणुका शहाणेंनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बकेट लिस्ट या मराठी सिनेमात प्रमुख भूमिका केली होती. माधुरी दिक्षीतची निर्मिती असलेल्या या सिनेमातील त्यांची भूमिका बरीच गाजलीही होती. आता रेणुका शहाणे सज्ज झाल्या आहेत दिग्दर्शनासाठी. हो तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. 

या सिनेमाचं नाव आहे त्रिभंगा. हा संपूर्णपणे स्त्रीप्रधान सिनेमा असणार आहे. शबाना आझमी, काजोल आणि सोशल मिडियावर प्रसिद्ध असणारी मिथिला पालकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका असणार आहे. शबाना आझमी,काजोल आणि मिथिला पालकर या पहिल्यांदाच  सिनेमात एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाच्या चित्रीकरणाला कधी सुरवात होईल आणि हा सिनेमा कधी रिलीज होणार आहे यासंदर्भात लवकरच माहिती जाहीर होणार आहे. मात्र रेणुका शहाणे यांचं दिग्दर्शन आणि शबाना आझमी,काजोल आणि मिथिला पालकर यांची अप्रतिम अदाकारी पाहण्यासाठी रसिक नक्कीच उत्सुक असतील. 

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन रेणुका शहाणे यांनी केलं होतं. हा सिनेमा रेणुकाची आई आणि प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांच्या रीटा वेलिंगकर या पुस्तकावर आधारित होता. या सिनेमात जॅकी श्रॉफ,पल्लवी जोशी,मोहन आगाशे आणि तुषार दळवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.