अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या टॅरिफ धोरणामुळे चर्चेत आहेत. यामुळे त्यांच्यावर केवळ भारतातच नाही तर अमेरिकेतही टीका होत आहे. कॅनडियन असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भाष्य केलं. डोनाल्ड ट्रम्प यांचे विचार कधी कधी पटतात तर कधी कधी त्यांचं बोलणं पटत नसल्याचं सनी लिओनी म्हणाली.
सनीने नुकतीच बीबीसी हिंदीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल विचारण्यात आलं. ती म्हणाली, "हा खरं तर खूपच कठीण प्रश्न आहे. कोव्हिडमध्ये मी कॅलिफोर्नियामध्ये राहत होते. जिथे ट्रम्पविरोधी वातावरण असायचं. तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की जेव्हा मित्रांसोबत गेट टुगेदर होईल तेव्हा राजकारणाबद्दल बोलायचं नाही. कारण राजकारणाचा विषय निघाल्यावर मित्र मित्र राहत नाहीत. तुम्ही मैत्री गमावता. प्रत्येकाची एक बाजू असते आणि त्यावर प्रत्येकालाच ठाम राहायचं असतं. त्यावर मध्यमार्ग काढायचा नसतो. एकतर लोक त्यांना पसंत करतात किंवा त्याचा तिरस्कार करतात. यामध्ये काहीच नसतं".
पुढे ती म्हणाली, "मला असं वाटतं की ती वेळ पुन्हा आली पाहिजे जेव्हा आपण आपल्या नेत्यांवर पुन्हा प्रेम करू शकू. ट्रम्प यांच्या काही गोष्टी मला आवडतात. पण कधी कधी असं वाटतं की हे देवा आता तुम्ही बस करा. या सगळ्याने खरंच अर्थव्यवस्थेत बदल होईल का? आणि या सगळ्यासाठी आपल्याला किती किंमत मोजावी लागेल? आणि त्यानंतर काय बदलेल? मला खरंच असं वाटतं की जे काही चाललंय त्याची गरज नाही. माझी अवस्था त्या लोकांसारखी आहे ज्यांना वाटतं की आपण निवडूण दिलेल्या नेत्यावर प्रेम केलं पाहिजे".