आमिरचा आगामी चित्रपट ‘सारे जहाँसे अच्छा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 21:17 IST
बॉलिवूड स्टार व मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सध्या आगामी ‘दंगल’ चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. महावीर सिंग ...
आमिरचा आगामी चित्रपट ‘सारे जहाँसे अच्छा’
बॉलिवूड स्टार व मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सध्या आगामी ‘दंगल’ चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहे. महावीर सिंग फोगट यांचा बायोपिक म्हणून ‘दंगल’चा उल्लेख केला जात आहे. आता आमिर आणखी एका बोयपिकच्या तयारीला लागला आहे. अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित ‘सारे जहाँसे अच्छा’ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे खुलासा त्याने केला आहे. ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आमिर यशराज बॅनरच्या ‘ठग्स आॅफ हिदोस्थान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. यासाठी त्याने आपल्या लूकवर मेहनत घेणे सुरू केले आहे. या चित्रपटात तो बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन व टीव्ही स्टार मृणाल ठाकूर यांच्यासोबत पडदा शेअर करताना दिसेल. मात्र या चित्रपटानंतर तो पुन्हा एकदा बायोपिक करणार असल्याचे आमिरने एका कार्यक्रमात सांगितले. मीडियात झळकलेल्या बातमीवर विश्वास ठेवला तर आमिर खान बॉलिवूडमध्ये अंतराळवीरांची भूमिका साकारणारा पहिला अभिनेता ठरू शकतो. सोबतच अंतराळ या विषयावरील हा पहिला बॉलिवूड चित्रपट असेल. आमिर खानचा आगामी दंगल हा चित्रपट २३ जानेवारीला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ७५ कोटी रुपये कमाविल्याचे सांगण्यात येते. कोण आहे राकेश शर्मा भारतीय वायू दलातील वैमानिक विंग कमांडर राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळवीर होता. रशीयाच्या सहाय्याने पाठविण्यात आलेल्या ‘सोयूझ टी-२’ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेतला होता. राकेश शर्मा याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून संवाद साधला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘अंतराळातून भारत कसा दिसतो’? असा प्रश्न विचारला होता त्यावर राकेश शर्मा यांनी ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ असे अभिमानाने उत्तर दिले होते. संपूर्ण भारताने त्याने दिलेल्या उत्तराची प्रशंसा केली होती. भारत सरकारने अशोक चक्र देऊन राके श शर्मा यांचा सन्मान केला आहे.