Join us

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’साठी आमिर खानने तोडला नियम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 17:19 IST

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याने स्वत:साठीच काही नियम घालून दिले असून, तो ते कधीच तोडत नाही. मात्र त्याच्या ...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याने स्वत:साठीच काही नियम घालून दिले असून, तो ते कधीच तोडत नाही. मात्र त्याच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी त्याने एक महत्त्वपूर्ण नियम तोडला आहे. होय, आमिरच्या या चित्रपटात त्याच्या अपोझिट अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, अभिनेत्री रिपीट करण्याचा नियमही आमिरने तोडला आहे.  आमिरबरोबर ‘दंगल’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या बहुचर्चित चित्रपटात त्याच्या अपोझिट दिसणार आहे. ज्या भूमिकेसाठी फातिमाची निवड करण्यात आली, त्या भूमिकेच्या रेसमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन यांच्या नावाची चर्चा होती. आता या सगळ्यांच्या नावावर पूर्णविराम देत फातिमाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच फातिमाने या भूमिकेसाठी लुक टेस्ट दिली होती. याविषयीचे तिचे काही फोटोजही व्हायरल झाले होते. ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये असलेली फातिमा एखाद्या योद्धाप्रमाणे दिसत होती. फातिमाने ‘दंगल’ या सुपरहिट चित्रपटात गीता फोगाटची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे तेव्हा सर्वत्र कौतुकही केले गेले. विशेष म्हणजे मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानही तिच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसला. फातिमाची ही निवड आणखी एका कारणाने महत्त्वपूर्ण समजली जात आहे. ते कारण म्हणजे आमिर कधीच त्याच्या अभिनेत्रीला रिपिट करीत नाही. मात्र स्वत: आमिरनेच हा ट्रेण्ड तोडला असल्याने, फातिमा पुन्हा एकदा आमिरसोबत स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाची शूटिंग जूनमध्ये सुरू आहे. इतर चित्रपटांप्रमाणेच याही चित्रपटासाठी आमिर जबरदस्त मेहनत घेताना दिसत आहे. दरम्यान, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटात आमिर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करीत असून, त्यांना ‘धूम’ फ्रेंचाइजीसाठी ओळखले जाते. हा चित्रपट २०१८ मध्ये दिवाळीनिमित्त रिलीज होणार आहे. यशराजच्या या चित्रपटात पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र बघावयास मिळणार आहेत.