71st National Film Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज(मंगळवार २३ सप्टेंबर) दिल्लीत ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला प्रदान करण्यात आला. तब्बल ३३ वर्षांच्या करिअरनंतर शाहरुख खानने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली.
राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी शाहरुख खान खास लूकमध्ये पोहोचला होता. जवान सिनेमासाठी शाहरुखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी शाहरुखने खास लूक केला होता. सूटबूटमध्ये शाहरुख दिसून आला. पण त्याचे केस मात्र पांढरे दिसले. शाहरुखने मंचावर येताच प्रेक्षकांना नमस्कार केला. त्याच्या या कृतीने सगळ्यांचीच मनं जिंकली.
'जवान' सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात शाहरुखने दुहेरी भूमिका साकारली होती. या सिनेमात त्याने सैन्य अधिकारी विक्रम राठोड आणि त्याचा जेलर मुलगा आजाद अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. साऊथ दिग्दर्शक अॅटली कुमारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात दीपिका पादुकोन, नयनतारा, सान्या मल्होत्रा, विजय सेतुपती यांच्याही भूमिका होत्या.
'जवान' सिनेमासाठी शाहरुख खान आणि '१२वी फेल' या चित्रपटासाठी विक्रांत मेसी यांना संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. शाहरुखचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. तर अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. राणीला 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या सिनेमासाठी हा पुरस्कार दिला आहे.