Join us  

आर. के. स्टुडिओ जमीनदोस्त; आता उरल्या त्या केवळ स्मृती...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 10:36 AM

आता या रिअ‍ॅलिटी क्षेत्राव गोदरेज प्रॉपर्टीजचे नाव असणार आहे. राज कपूर यांच्या घामाने सिंचलेल्या या ऐतिहासिक स्टुडिओच्या आता उरल्या त्या केवळ आठवणी.

ठळक मुद्दे2.2 एकरात पसरलेल्या या स्टुडिओच्या देखभालीचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कपूर कुटुंबाने स्पष्ट केले होते.

मुंबईच्या चेंबूर भागातील 71 वर्षे जुना आर. के. स्टुडिओ आता केवळ कागदावर जिवंत असेल. गुरुवारी म्हणजेच काल 8  ऑगस्ट 2019 रोजी   चित्रपटांच्या सुवर्णयुगाची साक्षीदार असलेली ही वास्तू जमीनदोस्त झाली. आता या रिअ‍ॅलिटी क्षेत्राव गोदरेज प्रॉपर्टीजचे नाव असणार आहे. राज कपूर यांच्या घामाने सिंचलेल्या या ऐतिहासिक स्टुडिओच्या आता उरल्या त्या केवळ आठवणी.

2017च्या सप्टेंबर महिन्यात या स्टुडिओला आग लागली आणि या आगीत या स्टुडिओतील अनेक वर्षे जपून ठेवल्या स्मृती जळून खाक झाल्यात. यानंतर गतवर्षी  ऑगस्टमध्ये कपूर कुटुंबीयांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला. 2.2 एकरात पसरलेल्या या स्टुडिओच्या देखभालीचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कपूर कुटुंबाने स्पष्ट केले.

काहींचे मानाल तर 2017 मध्ये हा स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, त्याचवेळी कपूर कुटुंबाने तो विकण्याच्या निर्णय घेतला होता.  गोदरेज प्रॉपर्टीने हा स्टुडिओ विकत घेतला. हा सौदा कितीत झाला, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

बॉलिवूड गहिवरलेअनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असलेला हा स्टुडिओ ध्वस्त झालेला पाहून कपूर कुटुंबच नाही तर बॉलिवूडही गहिवरले. अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दलच्या भावना व्यक्त केला.

‘माझ्या या स्टुडिओशी कुठल्याही व्यक्तिगत भावना जुळलेल्या नाहीत. पण हा स्टुडिओ ध्वस्त झालेला पाहून मन गहिवरून आले. आयकॉनिक स्टुडिओ. सरकार याच्या संरक्षणासाठी पाऊले उचलेल आणि नव्या पिढीसाठी तो वाचवेल,अशी आशा करते. या स्टुडिओने हिंदी सिनेमाला अनेक अजरामर सिनेमे दिलेत,’ असे अभिनेत्री रिचा चड्ढाने लिहिले.

दिग्दर्शक निखील अडवाणीने लिहिले, ‘1948 मध्ये उभारण्यात आलेला हा स्टुडिओ मुव्ही लेजेंडचे हेडक्वॉर्टर होते. राज कपूर फिल्म प्रॉडक्शन कंपनी, आर के फिल्म्स आणि अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे येथे शूट झालेत.’

अनेक चित्रपटांचा साक्षीदार

1951 मध्ये मधला आवारा, 1953 मध्ये आलेला आह,1955मधला श्री 420, त्यानंतर आलेले  जागते रहो,  जिस देश मे गंगा बहती है, सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली, हिना, प्रेम ग्रंथ  अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्ये झाली आहे. या सर्व चित्रपटांचे कॉस्च्युम आर. के. स्टुडिओमध्ये संग्रहित ठेवले गेले होते. पण 2017 च्या आगीत हे सगळे कॉस्च्युम भस्म झालेत.  आर. के. स्टुडिओमध्ये शूटींग झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे कॉस्च्युम येथे संरक्षित ठेवले जात. नरगिसपासून तर ऐश्वर्या राय बच्चनने त्यांच्या चित्रपटांत घातलेले पोशाख येथे संग्रहीत करण्यात आले होते. पण ते सगळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जिस देश में गंगा बहती है या चित्रपटात पद्मिनीने घातलेले ज्वेलरी याठिकाणी संग्रहीत करण्यात आली होती. 

लोगोची कथा

सन 1949 मध्ये राज कपूर आणि नर्गिस यांचा ‘बरसात’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने अपार लोकप्रीयता मिळवली. या चित्रपटाचे पोस्टरही तुफान गाजले. राज कपूर यांच्या एका हातात व्हायोलिन आणि दुस-या हातावर रेटलेली प्रणयधूंद नर्गिस हे पोस्टर प्रचंड लोकप्रीय झाले. इतकं की, राज कपूर यांनी आर. के. स्टुडिओच्या लोगोही तसाच बनवला. 1940 ते 60च्या दशकात राज कपूर आणि नर्गिस यांच्या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. या दोन्ही कलाकारांनी जवळपास 16 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.  कदाचित म्हणूनच आर. के. स्टुडिओच्या लोगोत नर्गिसने जागा मिळवली. पण आर. के. स्टुडिओच्या लोगोची कहाणी इतकीच नाही तर यापेक्षाही रोचक आहे.होय, जर्मनीचे महान कंपोजर व व्हायोलिनवादक बीथोवनने व्हायोलिनचा एक म्युझिक पीस बनवला होता. काळीज चिरत जाणारी ही ट्यून ऐकून महान लेखक लियो टॉलस्टॉय चांगलेच प्रभावित झाले. इतके की त्यांनी यावर एक लघुकादंबरी लिहिली. या कादंबरीत एक हृदयस्पर्शी प्रेमकथा होती. एक व्हायोलिनवादक एका महिलेवर जीवापाड प्रेम करतो. पण त्या महिलेला त्याचे दु:ख आणि त्याचे प्रेम समजून घ्यायला वेळ नसतो. तिचा तो कोरडा व्यवहार बनून तो व्हायोलिनवादक इतका व्यथित होतो की, सरतेशेवटी तिची हत्या करतो. टॉलस्टॉयच्या या लघुकादंबरीला रशियात बॅन करण्यात आल. पण जगभरात ही कादंबरी वाचली गेली. 

टॅग्स :आर के स्टुडिओ