Join us  

1983 या चित्रपटात रणवीर सिंग नव्हे तर हा अभिनेता साकारणार होता कपिल देव यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 7:29 PM

83 या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी पहिली पसंती ही रणवीर नव्हे तर बॉलिवूडमधील एक दुसरा नायक होता. 

ठळक मुद्दे1983 हा चित्रपट रणवीर सिंगच्या आधी रणदीप हुड्डाला ऑफर करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पुरण सिंह करणार असून या चित्रपटाची घोषणा देखील करण्यात आली होती.

रणवीर सिंग सध्या 83 या त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. 1983 साली भारताने सगळ्यात पहिल्यांदा विश्वकप जिंकला होता. या टीमचे नेतृत्व कपिल देव यांनी केले होते. याच विश्वचषकावर आधारित 83 हा चित्रपट असून रणवीर या चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी पहिली पसंती ही रणवीर नव्हे तर बॉलिवूडमधील एक दुसरा नायक होता. 

1983 हा चित्रपट रणवीर सिंगच्या आधी रणदीप हुड्डाला ऑफर करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पुरण सिंह करणार असून या चित्रपटाची घोषणा देखील करण्यात आली होती. पण या चित्रपटाचे निर्माते विष्णू इंदूरी आणि त्यांच्यात काही मतभेद झाल्याने हा चित्रपट त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आणि या चित्रपटात कबीर खानची वर्णी लागली. कबीर खान या चित्रपटाचा भाग बनल्यानंतर या चित्रपटात रणदीप हुड्डा ऐवजी रणवीर सिंगला मुख्य भूमिकेत घेण्यात आले. 

रणवीर सिंग आणि त्याच्या 83 सिनेमाच्या संपूर्ण टीमला नुकतेच धर्मशालामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओत रणवीर क्रिकेटमधले बारकावे शिकताना दिसला होता. स्वत: कपिल देव या व्हिडीओत रणवीर सिंगला क्रिकेटचे धडे देताना दिसले होते. रणवीरने देखील या कॅम्पमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडिओत सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खानसुद्धा दिसला होता. 

क्रिकेट वर्ल्डकप १९८३ भारतासाठी विशेष होता. बलाढ्य वेस्ट इंडिज टीमला फायनलमध्ये चारीमुंड्या चीत करत कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. या ऐतिहासिक विजयामुळे तमाम भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. कपिल देव यांच्या त्या भारतीय टीमचं नाव सुवर्णाक्षरांनी क्रिकेट इतिहासात नोंदवलं गेलं.

आता भारतीय क्रिकेट टीमचा पहिला वर्ल्डकप जिंकल्याचा हाच पराक्रम रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. मात्र हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.  

टॅग्स :रणवीर सिंग८३ सिनेमारणदीप हुडा